मुंबई : प्रतिनिधी
भाजपाने या शपथविधीची माहिती शिवसेना शिंदे गटाला दिलीच नव्हती अशी नवी माहिती आता समोर आली असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून शपथविधीबाबत कळले, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला आहे.
दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला आहे. ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी होणार असून याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, भाजपाने या शपथविधीची माहिती शिवसेना शिंदे गटाला दिलीच नव्हती अशी नवी माहिती आता समोर आली असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून शपथविधीबाबत कळले, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. मंगळवारी (ता. ३ डिसेंबर) सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेल्या सामंतांनी एका मराठी वृत्तवाहिनीला ही माहिती दिली.
शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनीही फडणवीसांची भेट घेतली. यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. भाजपाकडून महायुतीतील खाती वाटपाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यातही शिंदे गटासाठीची कोणतीही सकारात्मकता अद्यापही दिसून आलेली नाही, याबाबत सामंत यांना विचारण्यात आले असता, ते म्हणाले की, ५ तारखेला शपथविधी आहे, हे आम्हाला बावनकुळेंच्या ट्वीटवरून कळाले आहे. अजून त्याला ४८ तास आहेत, ४८ तासांमध्ये अनेक घडामोडी घडू शकता, असे सामंतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.
तसेच, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे जो प्रस्ताव ठेवला होता, त्यासंदर्भात ते स्वत: त्यांच्याशी चर्चा करणार होते. पण या दोघांमधील ही चर्चा झाली की नाही, हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे याबाबत अंदाज लावण्यातही काही अर्थ नाही. मात्र, योग्यतो सन्मानपूर्वक निर्णय होईल, अशी आशा उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.