23 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeउद्योगसिगारेट, तंबाखू, बूट महागणार; पॅकेज्ड पाणी, विमा, सायकल स्वस्त होणार!

सिगारेट, तंबाखू, बूट महागणार; पॅकेज्ड पाणी, विमा, सायकल स्वस्त होणार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
येत्या २१ डिसेंबर रोजी ‘जीएसटी’ परिषदेची बैठक होईल. या बैठकीनंतर सिगारेट, तंबाखूच नाही, तर अनेक वस्तूंच्या किंमती महागण्याची शक्यता आहे. तंबाखू, सिगारेटवर २८% नाही तर ३५% जीएसटी आकारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य आणि जीवन विम्यावरील ‘जीएसटी’ सवलतीचा विचार होऊ शकतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ‘जीएसटी’ परीषद होणार आहे.

२१ डिसेंबर रोजीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये सिगारेट आणि तंबाखूवरील ‘जीएसटी’ वाढविल्या जाऊ शकतो. सिगारेट आणि तंबाखूवर ‘जीएसटी’ वाढविण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा सरकारने सिगारेट आणि तंबाखूवर कर लावला आहे. ‘जीएसटी’ दरांना तर्कसंगत करण्यासाठी मंत्र्यांच्या समूहाने बदल सुचवला आहे.

या उत्पादनावर सध्या २८% जीएसटी लावण्यात आला आहे. तो वाढवून आता ३५% करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महसूल वाढीसाठी हा प्रयत्न करण्यात येणार आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समूहाने सोमवारी हा दर निश्चित करण्यासाठी बैठक घेतली. या समूहाने तंबाखूवर ३५% दर प्रस्तावित करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. त्यासाठी ५%, १२%, १८% आणि २८% या चार स्तरावर ही विभागणी असेल. यामध्ये नवीन दर ३५ टक्क्यांचा दर पण प्रस्तावित आहे.

विमा क्षेत्रावरील ‘जीएसटी’वरून सध्या केंद्र सरकारवर मोठा दबाव आहे. या बैठकीत विमा क्षेत्रातील काही उत्पादनावर मोठी सवलत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. विमा स्वस्त होऊ शकतो. आरोग्य विमा स्वस्त झाल्यास मध्यम वर्गीयांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

‘जीएसटी’ कमी होणार : पॅकेज्ड पाणी (२० लिटर आणि जास्त) : ‘जीएसटी’ १८% टक्क्यांहून ५% कमी करण्याचा प्रस्ताव, १०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सायकलीवर ‘जीएसटी’ १२% टक्क्यांहून ५%वर आणण्याचा प्रस्ताव, तर शालेय नोटबुकवर ‘जीएसटी’ १२% टक्क्यांहून ५% करण्याचा प्रस्ताव.

‘जीएसटी’त वाढ होणार : १५,००० रुपये प्रति जोडी बुटावरील १८ टक्के जीएसटी हटवून तो २८% करण्यात येणार, २५,००० रुपयांपेक्षा महागड्या मनगटी घड्याळांवर ‘जीएसटी’ १८% टक्क्यांहून २८% पर्यंत
वाढ होणार.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR