लातूर : सुगंधित तंबाखू, गुटख्याचा साठा करुन ठवेलेल्या शेडवर दहशतवादविरोधी शाखेच्या पथकाने छापा मारला. यावेळी जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी खरोळा (ता. रेणापूर) शिवारात मंगळवारी केली. याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले, पांढरी (ता. रेणापूर) गावातील दोघांनी खरोळा शिवारात शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधित पानमसाला, गुटखा आणि तंबाखूचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याची माहिती खबऱ्याने लातूर येथील दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाला दिली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने अचानकपणे शेतातील शेडवर छापा मारला.
या छाप्यात सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा असा एकूण २ लाख ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी बालाजी गणपती ढोंबरे (वय ६५ रा. पांढरी ता. रेणापूर) यास ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता, हा साठा विक्री करण्यासाठी मी आणि मुलगा नागनाथ ढोंबरे यांनी करुन ठेवल्याची कबुली दिली. घटनास्थळाचा पथकाकडून पंचनामा करण्यात आला आहे. याबाबत दहशतवादविरोधी शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक अंगद कोतवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रेणापूर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
ही कारवाई परिविक्षाधीन पोलिस उपधीक्षक राजश्री तेरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आयुब शेख, सहायक पोलिस उपनिरीक्षक अंगद कोतवाड, सहायक फौजदार जाधव, पोलिस हवालदार शेख, गुंडरे यांच्या पथकाने केली.