बंगळूरू : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि माजी केरळ भाजपाध्यक्ष नलिन कुमार कटिलाल यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवार दि. ०३ डिसेंबर रोजी मोठा दिलासा दिला. सीतारामन आणि नलिन कुमार यांच्याविरुद्ध निवडणूक रोखे खरेदी करण्यासाठी व्यावसायिक संस्थांवर दबाव आणल्याप्रकरणी नोंदवलेला गुन्हा कोर्टाने रद्द केला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटिलाल यांनी दाखल केलेल्या याचिकेत एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी कटिलाल यांची याचिका स्वीकारली आणि गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला. बंगळुरू पोलिसांनी आदर्श आर अय्यर यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला होता.
निर्मला सीतारामन याचिकाकर्त्या नव्हत्या
या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अंमलबजावणी संचालनालय(ईडी) अधिकारी, भाजपचे अधिकारी आणि इतरांविरुद्धही एफआयआर नोंदवण्यात आला होता. ज्येष्ठ वकील केजी राघवन म्हणाले की, न्यायालयाने याचिकाकर्ते कटिलालविरुद्धचा एफआयआर रद्द केला आहे. आम्ही कटिलाल यांच्यावतीने याचिका दाखल केली होती. निर्मला सीतारामन या याचिकाकर्त्या नसल्याचे त्यांनी सांगितले.