पुणे : वृत्तसंस्था
हिवाळ्यात पडणा-या दाट धुक्यामुळे रेल्वेच्या वेगावर मर्यादा येते. वेगमर्यादा कमी झाल्यामुळे रेल्वेच्या नियोजित वेळेवर परिणाम होतो. काही वेळा गाड्या उशिरा धावतात. मात्र, नवीन धुके सुरक्षा उपकरणाद्वारे (फॉग पास डिव्हाइस) हा अडथळा दूर होणार असून, कमी दृश्यमानता असली, तरी लोकोपायलटला साधारण ५०० मीटरपर्यंतची सिग्नलची स्थिती समजणार आहे. पुणे विभागातील ८० इंजिनमध्ये फॉग पास डिव्हाईस उपकरणे बसवले आहेत. त्यामुळे धुक्यातही रेल्वेगाड्या सुरळीत धावतील.
दाट धुक्यामुळे अनेक वेळा रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. पण, त्यासाठी रेल्वेकडून फॉग पास डिव्हाईस हे उपकरण तयार करण्यात आले आहे. ते प्रत्येक रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. धुक्याच्या वेळी हे उपकरण रेल्वे इंजिनमध्ये ठेवण्यात येते. हे उपकरण ‘जीपीएस’ प्रणालीनुसार चालते. धुक्यात चालकांना सिग्नल दिसण्यात या उपकरणामुळे मदत होते.
कर्मचारी असलेली आणि नसलेली रेल्वेची फाटके, वेगावर कायमस्वरूपी निर्बंध असलेले विभाग आदींबाबतची माहिती रेल्वे चालकांना ५०० मीटर आधी उपकरणावर दिसते. त्यामुळे गाडीच्या वेगाबाबत विचार करता येतो. उत्तर भारतामध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात दाट धुके पडते. त्यामुळे त्या गाड्यांच्या वेळापत्रकावर जास्त परिणाम होते. त्यामुळे या गाड्यांमध्ये प्रामुख्याने हे उपकरण बसविण्यात आले आहे.