वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
जुलै महिन्याच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प हे नॅशविले बिटकॉईन कॉन्फरन्समध्ये पोहचले होते. त्यावेळीच त्यांनी जगाला नवीन संदेश दिला होता. सत्तेत परतलो तर अमेरिकेला जगाची क्रिप्टो कॅपिटल करण्याची घोषणा त्यांनी या परिषदेत केली होती. त्यावेवळी बिटकॉईनच्या किंमतीत ४ टक्क्यांपेक्षा अधिकची उसळी दिसली होती. तेव्हा बिटकॉईन ६७ हजार डॉलरच्या घरात पोहचला होता.
अमेरिकन निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमत मिळवले. आता २० जानेवारी २०२५ रोजी ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. त्यापूर्वीच क्रिप्टोकरन्सीत बिटकॉईनने नवीन इतिहास रचला. बिटकॉईनची किंमत १ लाख डॉलरच्या घरात पोहचली. ५ नोव्हेंबरपासून बिटकॉईनच्या किंमतीत ५० टक्क्यांहून अधिकची उसळी दिसली आहे.
कॉईन मार्केटच्या आकडेवारीनुसार, बिटकॉईनचा भाव ७ टक्क्यांच्या तेजीसह १०२,६५६.६५ डॉलरवर व्यापार करत आहे. व्यापार सत्रा दरम्यान बिटकॉईनची किंमत १०३,९००.४७ डॉलरवर पोहचली आहे. बिटकॉईनच्या किंमतीत मोठी तेजी दिसली. बिटकॉईनचा भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात बिटकॉईनचा भाव ९४,६६०.५२ डॉलरसह निच्चांकावर पण पोहचला होता. बिटकॉईनचा भाव लवकरच १.२५ लाख डॉलरवर पोहचण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी दिनी २० जानेवारी २०२५ रोजी बिटकॉईन हा ऐतिहासिक उच्चांक गाठू शकतो.
गेल्या एका आठवड्यापासून बिटकॉईनने गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तर एका वर्षात बिटकॉईनने गुंतवणूकदारांना १४५ टक्क्यांहून अधिकची कमाई करुन दिली आहे. या वर्षाअखेर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे एलॉन मस्क यांच्या आवडत्या क्रिप्टोकरन्सीकडे सुद्धा सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. मस्क यांनी अमेरिकेमधील निवडणुकीत डॉगकॉईन आणि ट्रम्प यांचे जाहीर समर्थन केले होते. मस्क याच्या संपत्तीत आणि चलनात मोठी वाढ झाली आहे. आता डॉगकॉईन अजून भरारी घेण्याची शक्यता आहे.