28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरबिबट्याचे वास्तव्य असल्याचे निश्चित पुरावे; वनखाते सावध

बिबट्याचे वास्तव्य असल्याचे निश्चित पुरावे; वनखाते सावध

सोलापूर : सोलापूर परिसरापासून केवळ ८० कि.मी. अंतरावर बिबट्याचे वास्तव्य असल्याचे निश्चित पुरावे आढळल्याने वनखाते पूर्ण सावध झाले आहे. उपळाई ठोंगे भागातून बिबट्याचा प्रवास परंड्याच्या दिशेने होणार की, तो सोलापूरच्या वनक्षेत्रात घुसणार याकडे लक्ष वेधले गेले आहे. उपळाई ठोंगे येथे बिबट्याने शेळ्या मारल्याची घटना सोमवारी घडली. त्यानंतर परंडा भागातही बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले.

मागील पंधरवड्यात बिबट्यासदृश प्राणी वावरत असल्याच्या काही नोंदी सोलापूर वनखात्याकडे आल्या होत्या. मात्र, त्या घटनांच्या संदर्भात बिबट्या असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नव्हते. कारंबा भागात बिबट्याचा वावर असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यावेळी देखील वनखात्याने तत्काळ ट्रॅप व रेस्क्यू टीम सज्ज केली होती.

मागील पंधरवड्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्याच्या सीमेवर आणि त्यानंतर बार्शी तालुक्यात उपळाई ठोंगे येथे बिबट्याचे अस्तित्व आढळले. उपळाईत तीन शेळ्या बिबट्याने ठार मारल्याची घटना घडली. या घटनेचा तपास सुरू झाला आहे. मात्र परंड्यात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले. त्यामुळे या परिसरात फिरणारा प्राणी हा हा बिबट्याच आहे हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सोलापूरच्या वनखात्याने पुरावा समजून घेत, अत्यंत सावधपणे लक्ष देण्यास सुरवात केली आहे.

परंडा व उपळाई ठोंगे भागातून हा बिबट्या अन्नाच्या शोधात दर चोवीस तासात १० ते २५ कि.मी. अंतरावर कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. सोलापूरचे वनक्षेत्र बिबट्याच्या आढलेल्या वावराच्या स्थळापासून ८० किमीवर आहे. बिबट्या सोलापूरच्या वनक्षेत्रात प्रवेश करू शकतो. त्यामुळे आता उपळाई ठोंगे भागापासून पुढील काही तासात बिबट्या कोणत्या दिशेला सरकतो यावर खाते बारीक नजर ठेऊन आहे. तसेच नागरिकांना सावधगिरीच्या सूचना सातत्याने देण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR