परभणी : उद्यानविद्या पिकांची गुणवत्ता, अधिसूचना आणि वाण प्रसाराणासाठीच्या दि.५ ऑगस्ट रोजी झालेल्या ३१व्या केंद्रीय उपसमितीच्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या उद्यानविद्या संशोधन (भाजीपाला) केंद्राने विकसित केलेले टोमॅटो वाण पीबीएनटी-२०, मिरची वाण पीबीएनसी-१७ आणि विद्यापीठाच्या छ.संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण शिवाई यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्षपद नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या) प्रा. संजय कुमार सिंह यांनी भूषवले. बैठकी दरम्यान प्रा. सिंह यांनी या नव्या वाणांच्या महत्त्वावर भर दिला व वाणांचे बियाणे उत्पादन साखळीत समाविष्ट करण्याचे शिफारस केली. यामुळे शेतक-यांना या पिकांच्या उच्च दर्जाच्या बियाण्यांची सहज उपलब्धता होईल व उत्पादन क्षमता वाढवता येईल. या वाणांच्या अधिसूचनेनंतर संबंधित वाण बियाणे प्रमाणन प्रणालीसाठी समाविष्ट केले जातील, असे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या पत्राद्वारे कळविले आहे.
या नवीन वाणांच्या मान्यतेमुळे शेतक-यांना अधिक दर्जेदार आणि परिणामकारक वाण मिळून त्यांच्या उत्पादनामध्ये सकारात्मक बदल होतील. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मराठवाडा विभागातील शेतक-यांसाठी या वाणांच्या विकासामुळे कृषी संशोधनातील महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी करून वाण विकासातील सर्व सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. संशोधन संचालक डॉ खिजर बेग म्हणाले की, या वाणाच्या राष्ट्रीय मान्यतेमुळे उद्यानविद्या संशोधनास प्रेरणा मिळाली असून भविष्यात नवनवीन वाण विकास करण्यात येतील असे नमूद करून शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.