अहमदनगर : प्रतिनिधी
१३ जुलै २०१६ ला अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीनही आरोपींना २९ नोव्हेंबर २०१७ ला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मोर्चे निघाले, आंदोलने झाली. त्यानंतर या आरोपींना अखेर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
महाराष्ट्राला हादरून सोडणा-या या घटनेला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या विवाह सोहळ्यास हजेरी लावली आणि वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, शरद पवार यांनी जनतेचे ऐकावे, कार्यकर्त्यांचे आणि खोटं सांगणा-या कार्यकर्त्यांचे ऐकू नये. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पराभव स्विकारला पाहिजे. पवार साहेबांनी जनतेचे मत स्विकारले पाहिजे. लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उडेल, अशा प्रकारची वक्तव्य किमान शरद पवार यांनी तरी करू नयेत. ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असेलेले ते नेते आहेत. अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचे असते आणि पराभव स्विकारायचा असतो. ते कदाचित त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या दबावातून असे म्हणत असतील, पण त्यांना मनातून माहिती आहे, पराभव नेमका कशामुळे झाला? असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.