मुंबई : एकीकडे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे कारण म्हणजे बेळगावमध्ये होणा-या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्याने सीमावासियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. यावरून आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रावर टीका केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यापासून रोखण्यात आल्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत उमटले. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यासाठी संघर्ष करावा लागत असतानाच आता महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांनी सीमा भागात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
बेळगावला केंद्रशासित प्रदेश कधी करणार?
बेळगावमधील मराठी माणसावरील अन्याय, अत्याचार आणि अपमान आम्ही सहन करू शकत नाही. केंद्र सरकारने बेळगाव परिसरात जास्त निधी देऊन विकास करण्याचे आश्वासन दिले होते. बेळगावला केंद्रशासित प्रदेश कधी करणार? याचे उत्तर सरकारने द्यावे. तसेच सरकार कुणाचेही असले तरी अन्याय सहन करणार नाही, अशी ठाम भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.