मुंबई : प्रतिनिधी
नवे सरकार स्थापन झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीही पार पडला. त्यामुळे आता सगळ््यांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. महायुतीच्या गेल्या मंत्रिमंडळात २९ मंत्री होते. १४ जागा रिक्त होत्या. त्यामुळे तेव्हापासून अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. आता सत्ताधारी आमदारांचा आकडा थेट २३४ वर पोहोचल्याने कोणाकोणाला संधी द्यायची, असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसमोर निर्माण झाला आहे.
शिवसेनेचे तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, संजय राठोड, संजय सिरसाट या नावाला विरोध होऊ शकतो. महायुती सरकारमध्ये स्वच्छ चारित्र्याचे आमदार असावेत, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही आहेत. मंत्रिमंडळातील सहकारी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले, वादग्रस्त विधान करणारे नकोत, असा फडणवीसांचा आग्रह आहे. हे निकष पाहता शिवसेनेच्या ५ जणांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड, आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या मनस्थितीत फडणवीस नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या अन्य आमदारांना संधी मिळू शकते.
मंत्रिमंडळाचा विस्तार १२ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. भाजपकडे १३२ आमदारांचे संख्याबळ असल्याने महायुतीत त्यांचे पारडे जड आहे. सरकारचा चेहराच फडणवीस असल्याने सरकारमध्ये नवे आणि निष्कलंक चेहरे असावेत, अशी फडणवीसांची अट आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान देताना फडणवीस प्रत्येक आमदाराला पारखून देतील. आमदारांचे रिपोर्ट कार्ड दिल्लीलाही गेले आहे. त्यामुळे भाजप नेतृत्त्वाचीही मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची भूमिका असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री फडणवीस शिवसेनेला गृह विभाग सोडण्यास तयार नाहीत. एकनाथ शिंदेंना नगर विकास, अजित पवारांना अर्थ मंत्रालय दिले जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या २१ जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते तर शिवसेनेकडून १२, राष्ट्रवादीकडून १० जणांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.
शिवसेनेचे हे नेते मंत्रिपदाला मुकणार?
शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये मंत्री झालेले तानाजी सावंत (रुग्णवाहिका घोटाळ््याचा आरोप), अब्दुल सत्तार (टीईटी घोटाळ््याचा आरोप) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विभागाशी संबंधित तक्रारी मंत्रालयांपर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका तरुणीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणामुळे संजय राठोड अडचणीत आले होते तर संजय शिरसाट यांना त्यांची विधाने अडचणीची ठरू शकतात.