24.5 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeलातूरलातूरमध्ये भीषण अपघात, ४ ठार

लातूरमध्ये भीषण अपघात, ४ ठार

लातूर : प्रतिनिधी

शहरापासून जवळ असलेल्या वाघाळा पाटीजवळ आज मंगळवारी (१० डिसेंबर) कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील ४ जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारमधील सर्व प्रवाशी कारेपूर (ता. रेणापूर) येथील राहणारे असल्याची प्राथमिक माहिती आहे. मित्राची पुणे येथे पोलिसमध्ये निवड झाल्यामुळे हे मित्र आनंद साजरा करण्यासाठी जेवायला गेले होते.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कारेपूर या गावात राहणारे हे मित्र सोमवारी ९ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास जेवणासाठी मांजरसुंबा (जिल्हा बीड) जवळ गेले होते. तेथे जेवण करून ते पहाटे मांजरसुंबा येथील ब्रिज खाली शेकोटी करून थांबले. त्यानंतर पहाटे चार वाजता स्विफ्ट कार क्रमांक एम एच १४, एल एल ६७४९ ने मांजरसुंबा येथून निघून पुढे अंबासाखर कारखाना मार्गे रेणापूरकडे महामार्गाने जात होते.

तेवढ्यात अंबासाखर कारखान्याजवळ समोरून येणा-या ट्रकला समोरासमोर स्विफ्ट कारची धडक झाली. या अपघातात कारचा चुराडा होत स्विफ्ट कारमधील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात बालाजी शंकर माने (वय २७), फारुख बाबुमिंया शेख (वय ३०), दीपक दिलीप सावरे (वय २८), ऋतवीक गायकवाड (रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू) अशी मृतांची नावं आहेत. तर जखमींमध्ये मुबारक शेख, अजिम पाशुभाई शेख (३० वय) (पोलिस निवड) स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामा पडवळ पोलीस कर्मचारी नाना राऊत व त्यांच्या इतर सहका-यांनी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या महामार्गावर आजपर्यंत अनेक अपघात झाले असून या महामार्ग चौपदरी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 सांगली आणि बुलडाण्यात अपघात

सोमवारी रात्री मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातामुळे सात जणांचा मृत्यू घडल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रात तीन मोठे अपघात झाल्याचे समोर आले आहे. लातूर, सांगली आणि बुलडाण्यात अपघात झाला आहे. सांगलीमध्ये अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून बुलडाण्यात एसटी बस नाल्यात घसरल्यामुळे २६ जखमी झाले आहेत.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीहून सोलापूरला अमोल वाडकर हे नातेवाईकांसह निघाले होते. कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी फाट्याजवळ अचानक त्यांच्या मोटारीचे टायर फुटले. त्यामुळे वेगात असलेली मोटार कोलांट्या घेत सुमारे पाचशे फुटांपर्यंत रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. या अपघातात सुनीता कल्याणी यांच्या डोक्यास मार लागल्याने त्या जागीच ठार झाला. तर मोटारीतील सुशीला वाडकर, अमोल वाडकर, नीमा पोगले हे गंभीर जखमी झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR