दमास्कस : वृत्तसंस्था
सीरियामध्ये सत्तापालट झाल्यानंतर निर्माण झालेल्या अराजकाच्या स्थितीचा इस्रायल फायदा उचलत आहे. असदच्या सैन्याने मैदान सोडल्यानंतर सीरियाच्या सुरक्षेसाठी सरकार आणि सैन्यदल राहिलेले नाही. बंडखोरांनी सीरियाचा ताबा घेतल्यानंतर इस्रायलने गोलान हाइट्सला लागून असलेल्या सीरियाई क्षेत्राचा ताबा घेण्यास, आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.मागच्या ४८ तासात इस्रायलने सीरियामध्ये जवळपास ३०० एअर स्ट्राइक्स केले आहेत. त्यात सीरियाचे एअर फोर्स आणि एअर डिफेन्स नेटवर्क पूर्णपणे उद्धवस्त झाले. जवळपास सर्व विमाने, हेलिकॉप्टर्स आणि एअर डिफेन्स सिस्टिम या हल्ल्यात उद्धवस्त झाली.
बशर अल-असद सरकारच्या पतनानंतर तिथली काही घातक शस्त्रे कट्टरपंथीयांच्या हाती लागू शकतात, अशी शस्त्रास्त्रे इस्रायलने हवाई हल्ल्यात नष्ट केली. इस्रायली फायटर जेट्सनी कमीत कमी सीरियाई सैन्याच्या तीन एअर बेसवर बॉम्ब वर्षाव केला असे दोन सीरियन सुरक्षा सूत्रांनी सांगितले. यात २४ हेलिकॉप्टर आणि जेट विमानं होती. असद सत्तेवरून गेल्यानंतर हवाई तळांवरील हा सर्वात मोठा हल्ला आहे.
कतार, सौदी अरेबिया आणि इराकने इस्रायलच्या या हवाई हल्ल्याचा निषेध केला. सीरिया क्षेत्रावरील ताबा लवकरात लवकर सोडण्याचे आवाहन केले. त्याशिवाय हुती समूहाने सुद्धा क्यूनेत्रा आणि माउंट हरमोनमधील इस्रायली सैन्याच्या कारवाईवर चिंता व्यक्त केली. फक्त इस्रायलच नाही, अमेरिका आणि टर्कीने सुद्धा आप-आपल्या हित रक्षणासाठी सीरियामध्ये हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोमवारी माहिती दिली की, त्यांनी इसिसच्या जवळपास ७५ ठिकाणांवर हल्ला केला. टर्कीने सुद्धा कुर्द फोर्सच्या ठिकाणांना लक्ष्य केले.