अहिल्यानगर : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेचे पाच हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. या योजनेचा फॉर्म भरण्यात अंगणवाडी सेविकांचा खूप मोठा वाटा आहे. मात्र, त्यांना प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान आमच्या कामाचा मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविकांच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म अंगणवाडी सेविकांकडून भरण्यात आले. मात्र, त्यांना कामाचा मोबदला, म्हणजेच प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळाला नाही. महायुती सरकारला सत्ता स्थापन करण्यास याची मदत झाली. मात्र, या योजनेसाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला आमच्या कामाचा मोबदला द्यावा अशी मागणी महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
अहिल्यानगरातील ५ हजार १८३ अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेची जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक अर्जामागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले होते. सरकारने जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्त्यानुसार अंगणवाडी सेविका यांनी दोनशे ते तीनशे अर्ज भरलेले आहेत. मात्र , जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला असला तरी, अंगणवाडी सेविका या प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहिल्या आहेत.
राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत केली आहे. सध्या त्यांची जिल्हास्तरावर माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. माहिती उपलब्ध झाल्यास त्यांना लगेच प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी – महिला व बालकल्याण विभागाचे मनोज ससे यांनी दिली आहे.