अकोला : प्रतिनिधी
पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तरेकडील अति थंड परदेशामधून भारतात येणा-या स्थलांतरित पक्ष्यांचे अकोला जिल्ह्यातील जलाशयांवर आगमन सुरू झाले आहे. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणा-या या पक्ष्याचे थवेच्या थवे दिसून येत आहेत. भारताच्या उत्तरेकडील देशांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाल्यानंतर पक्षी दरवर्षी भारतात येतात.
हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे परदेशी पक्षी दक्षिण भारताकडे जाताना अकोला जिल्ह्यात काही काळ मुक्काम करतात. यातीलच काही पक्षी अकोल्यातल्या कापशी तलाव, कुंभारी तलाव, आखतवाडा तलाव, काटेपूर्णा जलाशय, पोपटखेड तलावासह जलाशयांवर दिसतायेत. तर काहींचा २ ते ३ महिन्यांचा दीर्घ मुक्काम असतो, तर काही पक्षी एक ते दोन दिवस थांबून पुढच्या प्रवासाला निघतात.
कोणकोणते पक्षी आले
चक्रवाक, तुतवार, कॉटन पिग्मी, नॉर्दन शींचलर, रेड फिस्टर्ड पोचाई, ब्राह्मणी धार, पद्रकदंब, ग्रे गेनी, चक्रांक बदक, मुनिया, गडवाल, शंकर, कॉमन पोचाई, छोटा आलर्जीसह अन्य परदेशी पक्ष्यांचे आगमन झाल्याचे दिसून आले.
विशेषत: युरोपीयन देश तसेच मंगोलिया, सैबेरिया परिसरातून विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यात दाखल होतात. स्थलांतरित पक्ष्यांचा हजारो किलोमीटर अंतर कापून नोव्हेंबरपासून ते डिसेंबर आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुक्काम असतो.