सातारा : प्रतिनिधी
माण तालुक्यातील म्हसवडमध्ये उभारण्यात आलेल्या माणदेशी चॅम्पियन्सच्या आधुनिक स्टेडियमचे उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते झाले. साक्षात क्रिकेटचा देव आपल्या भूमीत आल्याने संपूर्ण माणदेश भारावून गेला. उद्घाटनाच्या कार्यक्रमात नवोदित खेळाडूंनी ‘सचिन.. सचिन..’चा जयघोष केला.
माणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चेनता सिन्हा यांनी माण तालुक्यातील म्हसवडच्या मेगा सिटीत आधुनिक स्टेडियम उभारले आहे. या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला निमंत्रित केले होते. या कार्यक्रमासाठी सचिनने पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्यासोबत हजेरी लावली. स्टेडियमच्या उद्घाटनानंतर प्रशिक्षणार्थी खेळाडूंशी त्याने संवाद साधला. त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी नवोदित खेळाडूंसह महिला, तरुणींची झुंबड उडाली.
सचिन तेंडुलकर सहकुटुंब म्हसवडमध्ये दाखल झाल्यानंतर सनई-चौघड्याच्या सुरात पारंपरिक पध्दतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सचिनने मुलगी सारासह लहान मुलांसोबत रस्सीखेच खेळात भाग घेतला. या खेळात शेवटी सचिनचाच गट जिंकला. त्यानंतर सचिनने नवोदित खेळाडूंशी संवाद साधला. त्यांना मार्गदर्शन करून सल्लाही दिला. यावेळी माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.