22.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रमृत महिलेच्या हातातील बांगड्या चोरल्या

मृत महिलेच्या हातातील बांगड्या चोरल्या

कुर्ला अपघातातील व्हीडीओ व्हायरल

मुंबई : प्रतिनिधी
कुर्ल्यातील भीषण बस अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले आहेत. अपघातातील एका मृत महिलेच्या हातातील बांगड्या चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून व्हीडीओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, ९ डिसेंबर रोजी रात्री कुर्ल्यात बसचा भीषण अपघात झाला. ड्रायव्हरने ३०-४० गाड्यांना धडक देत काही नागरिकांनाही चिरडले. यामध्ये आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

याचदरम्यान माणुसकीला काळिमा फासणारी एक घटनाही त्या अपघाताच्या ठिकाणी घडली. बस अपघातानंतर जखमी झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आजूबाजूचे लोक धावले खरे पण तेथेच गाडीखाली सापडून मृत्यूमुखी पडलेल्या एक महिलेसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली. त्या मृत महिलेचा गाडीखाली चेंदामेंदा झालेला असतानाच तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्याचे उघड झाले आहे. अतिशय खालच्या थराची, माणुसकीला लाजवणारी ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नीस अन्सारी ( वय ५५) असे त्या महिलेचे नाव असून कुर्ला बेस्ट अपघातात गाडीखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढायचा सोडून कोणीतरी त्यांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्याच काढून घेतल्या. मोबाईलमध्ये हा प्रकार कैद झाला असून दोन अनोळखी इसम बसखाली निपचित पडलेल्या कन्नीस यांच्या हातातून बांगड्या काढून घेत असल्याचे त्यात दिसत आहे.

याप्रकरणी कन्नीस यांच्या मुलाचा हृदयद्रावक जबाब समोर आला आहे. कन्नीस अन्सारी या त्याच परिसरात काम करायच्या. ‘माझी आई कामाला जायची, त्यादिवशी ती ९ वाजता कामावर जाणार होती. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. आईच्या साडीवरून मी तिला ओळखले. पण आमच्या आईच्या हातात बांगड्या होत्या, त्या कोणीतरी काढून घेतल्या होत्या. कोणीतरी हातातल्या बांगड्या काढताना व्हीडीओत दिसत आहे. पण तो कोण हेच स्पष्ट कळत नाही असे कन्नीस यांच्या मुलाने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR