नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात बुरशी लागलेल्या मिठाईची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहकांनी ही मिठाई घरी नेल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील खेतेश्वर स्वीट हॉटेलमधील हा घाणेरडा प्रकार समोर आला आहे. अक्कलकुवा शहरातील काही नागरिकांनी खेतेश्वर स्वीट हॉटेलवरून मिठाई खरेदी करून घरी नेली. यानंतर ग्राहकाने घरी जाऊन मिठाईचा बॉक्स उघडला असता या मिठाईमधून उग्र स्वरूपाचा वास आला. यामुळे संबंधिताने मिठाई पहिली असता खराब आणि बुरशी लागलेली मिठाई असल्याचे आढलून आले.
अक्कलकुवा येथील खेतेश्वर स्वीट हॉटेल दुकानदाराकडे असलेली मिठाई ही साधारण महिनाभरापूर्वी बनवली असल्याची माहिती या प्रकरणानंतर समोर आली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कुठलीही तपासणीची कार्यवाही न केल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे.