नाशिक : प्रतिनिधी
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन लाल कांद्याची आवक दररोज मोठ्या प्रमाणावर होत आहे. लाल कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दाखल होत असल्याने दरात घसरण होत आहे.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून भाव खाणारा उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. आता नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यावरच सर्वांची भिस्त आहे. त्याची आवक वाढत आहे.
लासलगाव येथून कांद्याचे कंटेनर नुकताच श्रीलंकेसाठी रवाना झाला आहे. लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे निर्यात शुल्क २० टक्के रद्द केल्यास परदेशात भारतीय कांद्याला चांगली मागणी मिळू शकते, अशी अपेक्षा शेतक-यांना आहे.
निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी
कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यातशुल्क रद्द करावे, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. यासाठी केंद्र सरकारकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. लासलगाव बाजार समितीकडूनही केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू केल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले आहे.