नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जसा द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला, तसे तुम्ही हिंदुस्तानच्या युवकांचा अंगठा कापत आहात. देशातील सर्व उद्योग अदानीला दिले जात आहेत. देशातील उद्योगपतींचा अंगठा कापला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
संसदेत संविधानावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बोलत होते. संविधानावर चर्चा करताना राहुल गांधी यांनी अभय मुद्रेचा उल्लेख केला. आपले संविधान विचारांचा एक समूह आहे. संविधान एक जीवन दर्शन आहे. संविधान आमचा एक सांस्कृतिक विचार आहे. संविधानात प्राचीन वारसा सामावलेला आहे, असे खासदार राहुल गांधी म्हणाले. ‘आरएसएस’ने मनुस्मृतीला संविधानापेक्षा सर्वोत्तम ठरवल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. सावरकरांनी सुद्धा संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचं स्थान दिलं होतं, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, संविधानात आम्हाला बाबासाहेबांचे आदर्श दिसतात.
राहुल गांधींनी आपल्या भाषणात द्रोणाचार्य आणि एकलव्यचा उल्लेख केला. ‘जसा द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला, तसे तुम्ही हिंदुस्तानच्या युवकांचा अंगठा कापत आहात. देशातील सर्व उद्योग अदानीला दिले जात आहेत. देशातील अन्य उद्योजक, उद्योगपतींचा अंगठा कापला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. भाजपला देशाची ताकद हिसकावायची आहे. शेतक-यांऐवजी अंबानी, अदानी यांना फायदा पोहोचवला जातोय. पेपरलीक सारख्या प्रकरणात युवकांचा अंगठा जातोय, असे राहुल गांधी म्हणाले.