31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरध्वजदिन निधी संंकलनास प्रारंभ

ध्वजदिन निधी संंकलनास प्रारंभ

लातूर : प्रतिनिधी
ऊन, वारा, पावसाचा विचार न करता आपल्या भारत भूमीच्या रक्षणार्थ सीमेवर उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाप्रती भारतीयांच्या मनात आदराची भावना आहे. त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत, याची जाणीव सर्वांना आहे. आपल्या सैनिकांविषयी ऋण व्यक्त करण्याची संधी ध्वजदिन निधी संकलनाच्यामाध्यमातून प्रत्येक नागरिकाला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी ध्वजदिन निधीमध्ये आपले योगदान देवून जिल्ह्यात जास्तीत जास्त ध्वजदिन निधी संकलित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक बोर्डाच्या अध्यक्ष श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ झाला. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शरद प्रकाश पांढरे (निवृत्त), सेना पदक प्राप्त कर्नल गिरिधर कोले (निवृत्त), मेजर व्ही. व्ही. पटवारी (निवृत्त), ले. कर्नल बी. आर. हरणे (निवृत्त), कॅप्टन कृष्णा गिरी (निवृत्त), ईसीएचएसचे प्रभारी अधिकारी कर्नल प्रकाश राजकर (निवृत्त), माजी सैनिक सय्यद सब्बीर यांच्यासह माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिकांच्या पत्नी यांच्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून उत्पन्नाची संधी निर्माण करून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये सैनिक, माजी सैनिक यांच्या समस्या सोडविणे, त्यांना विविध शासकीय सेवा पुरविण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधितांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गतवर्षी ध्वजदिन निधी संकलनात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे राज्यपाल महोदय यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाचा सन्मान झाला. प्रशासनातील सर्व घटकांच्या योगदानामुळे जिल्ह्याचा गौरव झाला. हा पुरस्कार प्रेरणादायी असून या पुरस्कारामुळे जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यानुसार यापुढेही जिल्हा प्रशासन सैनिक, माजी सैनिक यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी नमूद केले.
ध्वजदिन निधीचा उपयोग हा सैनिक, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांसाठी होतो. गतवर्षी लातूर जिल्ह्याला जवळपास ४२ लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना सुमारे १ कोटी १६ लाख रुपये निधी संकलित झाला होता. यंदा ४८ लाख रुपये निधी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून जिह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी ध्वजदिन निधीमध्ये सढळ हाताने योगदान देण्याचे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी ले. कर्नल श्री. पांढरे यांनी प्रास्ताविकात केले. तसेच जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत सैनिक, माजी सैनिक यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनाला सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष कामगिरी करणारे माजी सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. गतवर्षीच्या ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शासकीय विभागांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. प्रारंभी स्वर रागिणी म्युझिकल ग्रुपने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले, जिल्हा सैनिक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एस. व्ही. घोंगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR