पुणे : प्रतिनिधी
उत्तरेकडे थंड वा-यांचा जोर वाढला आहे. अंदमानच्या समुद्रात कमी दाबचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान घसरले आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात प्रचंड घट झाली आहे. धुळ्यात ४.१ अंश सेल्सियस अशा नीच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात आणखी दोन दिवस थंडीचा लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडीचा जोर वाढला. पुणे शहरात शनिवारी १०.१ डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील किमान तापमान घसरले आहे. सध्या अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आहे. तसेच चक्रकार वा-यांची स्थिती समुद्र सपाटीपेक्षा ५.८ किमी आहे. यामुळे महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात हाडे गोठवणारी थंडी पडणार असल्याचे हवामान विभागने म्हटले आहे.
पुणे चांगलेच गारठले आहे. पुण्याचा पारा दहा अंशांखाली आला आहे. पुणे येथील एनडीए परिसरात ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी पहाटे एनडीए परिसरात नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर हवेली, माळीण, दौंड आणि शिवाजीनगर परिसरातील किमान तापमान दहा अंशांखाली नोंदवले गेले. मागील चार दिवसांपासून हवामानातील बदल आणि निरभ्र आकाश यामुळे किमान तापमानात झपाट्याने घट झाली आणि पारा ११ अंशापर्यंत खाली आला. मात्र, गेल्या २४ तासांत पारा दोन ते तीन अंशांनी घटला.
निफाडमध्ये ३.८ अंश सेल्सिअस तापमान
थंडीच्या कडाक्यामुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचा पारा घसरला आहे. निफाड तालुक्यातील ओझर येथे राज्यात किमान तापमानाची निच्चाकी नोंद झाली आहे. ओझरमध्ये ३.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ६.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची भीती आहे.
डिसेंबरमध्ये प्रथमच नीच्चांकी तापमान
उत्तरेतील अतिशीत वारे छत्रपती संभाजीनगरकडे वाहून येत आहेत. त्यामुळे राज्यात जळगाव शहरात ८.४, अहिल्यानगरमध्ये ८.७ आणि नागपूरमध्ये ९.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बुलडाणा, अकोला शहरांत तापमान १०.६ अंश होते. डिसेंबरमध्ये शहरात किमान तापमान प्रथमच १०.६ अंश नीचांकी पातळीवर गेले. यापूर्वी डिसेंबर २०२२ च्या पहिल्याच आठवड्यात १०.८ व त्यापेक्षा कमी तापमान गेल्याची नोंद आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये ११.७ अंश तापमानाची नोंद झाली. जालना शहराचा पारा ९ अंशावर आला आहे. गोंदिया जिल्ह्यात जिल्ह्यात ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.