नागपूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विधानसभेत ३५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. यामध्ये १४०० कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली. ही तरतूद प्रशासकीय पूर्ततेसाठी करण्यात आली आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना २१०० रुपये कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै २०२४ मध्ये सुरु करण्यात आली. या योजनेसाठी एकूण ४६ हजार कोटी वर्षाकाठी लागणार होते. मात्र, योजना जुलै २०२४ ते मार्च २०२५ यासाठी एकूण ३६ हजार कोटी लागणार होते. तशी तरतूद राज्य सरकारने केली आहे. यापैकी १७ हजार कोटी जुलै ते नोव्हेंबरसाठी वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित १९ हजार कोटी शिल्लक आहेत. शिंदे सरकारने निवडणुकीला सामोरे जाताना पुन्हा महायुतीची सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याची घोषणा केली होती.
एवढेच नव्हे, तर सत्ता येताच लगेचच डिसेंबरचा हप्ता २१०० रुपये करण्यात येईल आणि लगेचच तो खात्यात वर्ग केला जाईल, असे आश्वासन दिले होते. परंतु आता सरकार त्यावर काहीही बोलायला तयार नाही. उलट दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल, एवढेच काय ते बोलले जात आहे.
आताच्या पुरवणी मागणीत १४०० कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. मात्र, ही तरतूद प्रशासकीय पूर्ततेसाठी करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला आता साडेतीन हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यामुळे डिसेंबर ते मार्चपर्यंत १४ हजार कोटी रुपये लागणार आहेत. आताची तरतूद आणि मागील बाकी मिळून २० हजार ४०० कोटी शिल्लक आहेत.
योजनेद्वारे महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेतून जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यात रक्कम पाठवली जाते. राज्य सरकारने जुलै ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंतचे ५ हप्त्यांचे १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये दिले आहेत. आता महिलांना डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.