इंदूर : वृत्तसंस्था
ट्रॅफीक सिग्नल किंवा लोकल ट्रेनमध्ये भिक मागून भिकारी मात्र गब्बर होत असतात. अनेकदा हातपाय धडधाकट असलेले भिकारी देखील नाटक करुन पैसे मागताना दिसत असतात. देशातील मध्य प्रदेशात मात्र आता भिका-यांना दानधर्म करणा-यांवर आफत येणार आहे. मध्य प्रदेशातील इंदौर शहराने एक महत्वाचा निर्णय घेतला. इंदौर शहर भिकारी मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ जानेवारी २०२५ पासून भिक मागणा-यांवर थेट एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा अधिकारी आशीष सिंह यांनी या संदर्भात भिक मागणा-यांवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय याआधीच जाहीर केला आहे.
मध्य प्रदेशात पर्यटक वाढण्यासाठी हे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी भिक्षेक-यांना हटविण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनेकदा भिक्षेक-यांना भिक्षा देणा-यांची प्रवृत्ती या प्रकारांना वाढविण्यास प्रवृत्त करीत असतात. त्यामुळे भिक देणा-यांवरच थेट ( ऋकफ ) एफआयआर दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ‘भिक मागण्याच्या विरोधात आमची मोहीम या महिन्याच्या ( डिसेंबर ) अखेर पर्यंत चालू राहणार आहे. जर कोणी व्यक्ती १ जानेवारीपासून कोणा भिका-याला भिक देताना सापडला तर त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केला जाईल असे इंदौरचे कलेक्टर आशीष सिंह यांनी सांगितले.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाने देशातील दहा शहरांना भिकारी मुक्त करण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरु केला आहे. ज्यात इंदौर देखील सामील आहे. इंदौर शहर भिक्षेकरी मुक्त करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाच्या टीमनी गेल्या काही दिवसात १४ भिक्षेक-यांवर कारवाई केलेली आहे. या कारवाईत राजवाडा येथील शनिमंदिराजवळ भीक मागणा-या एका महिलेकडे ७५ हजार रुपये सापडले आहेत. तिने हे पैसे भीक मागून केवळ १० ते १२ दिवसात कमावले होते.