नागपूर : प्रतिनिधी
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. निवडणुकीनंतर हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे जोरदार रंगले आहे. यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होऊन देखील दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहत नसल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते. आता अखेर ७२ तासानंतर अजित पवार हे परतले आहेत.
महायुतीमध्ये बहुमत मिळून देखील सत्तास्थापन आणि मंत्रीमंडळ विस्तार अशा अनेक मुद्द्यांवरुन विलंब झाला आहे. तसेच नेत्यांमध्ये नाराजीनाट्य देखील सुरु झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्यामुळे अनेक बडे नेते नाराज आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील नाराज आहेत. त्याचबरोबर अजित पवार हे देखील दोन दिवस सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी झाले नव्हते. तसेच त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे वृत्त समोर आले होते. आता मात्र अजित पवार हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.
नागपूरमध्ये अजित पवार दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी अजित पवार यांची भेट घेतली. तसेच उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत. त्याचबरोबर बीड प्रकरणात आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता अजित पवार हे कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवार हे मागील दोन दिवसांपासून विधानसभा कामकाजामधून देखील गायब होते. आता अजित पवार हे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कामावर रुजू झाले आहेत. यामध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो देखील समोर आला आहे. दोन दिवस संपर्क होत नसल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. आता मात्र अजित पवार यांच्याशी संपर्क न लागल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. आता मात्र अजित पवार समोर आल्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
अजित पवारांना थ्रोट इन्फेक्शन : अमोल मिटकरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे मंत्रिपदे रखडलेली नाहीत. त्यांना घशाचा संसर्ग (थ्रोट इन्फेक्शन) झाल्यामुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले होते, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बुधवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. सतत कामात व्यस्त असल्यामुळे काही मानवी मर्यादा असतात. त्यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते नॉट रिचेबल होते. त्यांच्यामुळे मंत्रिपदेदेखील रखडलेली नाहीत.
भुजबळांची नाराजी दादा स्वत: दूर करतील
छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची नाराजी स्वत: अजित पवार दूर करतील. आज त्यांचा नाशिक येथे मेळावा आहे. तिथे ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील, अशी अपेक्षा असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. मात्र, भुजबळांच्या काही उतावीळ कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोला जोडे मारून केलेले आंदोलन आम्ही खपवू घेणार नाही, असा इशारादेखील त्यांनी दिला.