नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यसभेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी एक वक्तव्य केले. यावेळी अमित शाह म्हणाले की, आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे. सगळीकडे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणायचे. त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर स्वर्गात जागा मिळाली असती, असे शाह म्हणाले. शाहांनी केलेल्या या वक्तव्यांचे विधिमंडळात पडसाद उमटले असून विरोधकांना या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शाहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असल्याचा आरोप काँग्रेस आणि विरोधकांनी केला आहे. शाह यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी आग्रही मागणी काँग्रेस आणि विरोधकांनी केली आहे. अशातच अमित शाहांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यांचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधकांनी या वक्तव्यावर शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘जे मनुस्मृतीवर विश्वास ठेवतात ते निश्चितपणे आंबेडकरांशी त्यांचे मतभेद असतील. अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या विधानाचा निषेध विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आवारात केला आहे. काँग्रेसच्या प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड , रजनी पाटील, प्रशांत पडोळे इत्यादीसह अनेक नेते या निदर्शनात सहभागी झाले आहे. दरम्यान वक्तव्याचे पडसाद आता राज्याच्या विधिमंडळात देखील उमटताना दिसत आहेत.
आंबेडकर यांचे नाव घेण्याचं यांना वावडं का? : नितीन राऊत
या विषयी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार नितीन राऊत म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचं यांना वांवडं का? हा देशाचा अवमान आहे. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी सर्वस्वी असल्याचे ते म्हणाले.
बाबासाहेबांचा अपमान काँग्रेसकडूनच : शेलार
तर यावर बोलताना भाजप आमदार अशिष शेलार म्हणाले की, संसदेचा मुद्दा या ठिकाणी कसा मांडला जातो? काही नियम आहेत की नाही? आम्हाला मार्गदर्शन करा. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा काँग्रेस ने केला असल्याचे अशिष शेलार म्हणाले.
संसद परिसरात ‘जय भीम’च्या घोषणा
संसद परिसरात विरोधकांनी अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निदर्शने केली. तर, लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत, ‘जय भीम’च्या घोषणा दिल्या. गृहमंत्री अमित शहा यांनी भारताचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यावरून अमित शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.