बिनविरोध निवड, आज होणार औपचारिक घोषणा
नागपूर : प्रतिनिधी
अडीच वर्षाहून अधिक काळ रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतिपदी अखेर भाजपचे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापतिपदाच्या निवडणुकीत केवळ शिंदे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित झाली आहे. उद्या गुरूवारी विधान परिषद सभागृहात शिंदे यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाईल.
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ७ जुलै २०२२ रोजी सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आल्यापासून सभापतिपद रिक्त होते. त्यामुळे राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी उपसभापती डॉ. निलम गो-हे यांनी सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. सभापतिपदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून या पदासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. सत्ताधारी पक्षाकडे स्पष्ट बहुमत असल्याने महाविकास आघाडीने सभापतिपदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे.
सभापतिपद मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रही भूमिका घेतली होती. शिंदे गटातून उपसभापती डॉ. निलम गो-हे यांच्या नावाची सभापतिपदासाठी चर्चा होती; परंतु भाजपाने हे पद स्वत:कडेच ठेवले आहे. भाजपकडून राम शिंदे व प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा होती. मंत्रिमंडळात धनगर समाजाला प्रतिनिधित्व न दिल्याने नाराजी होती. राम शिंदे यांना सभापतिपद देऊन ही तक्रार दूर करण्यात आली आहे. राम शिंदे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत आदी नेतेमंडळी उपस्थित होती. शिंदे यांचाच एकमेव अर्ज असल्याने सभापतिपदी त्यांची बिनविरोध निवड मानली जात आहे. उद्या, गुरूवारी विधान परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा होऊन शिंदे हे सभापतिपदी सन्मानपूर्वक विराजमान होणार आहेत.