नागपूर : विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपकडून राम शिंदे यांनी बुधवारी सकाळी विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता.
तर राम शिंदे यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार राम शिंदे यांच्या निवडीची घोषणा आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी सभागृहात केली. त्यानंतर राम शिंदे हे त्यांच्या आसनाकडे जात असताना निलम गो-हे यांनी केलेल्या विधानामुळे विधानपरिषदेमध्ये हास्यकल्लोळ उडाला. विधान परिषदेच्या सभापतीपदी प्रा.राम शंकर शिंदे यांची गुरुवारी आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रा. राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी राम शिंदे यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्यबद्दल विरोधी पक्षाचा सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. मात्र उपसभापती निलम गो-हे यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच चेह-यावर हसू उमटले.
प्राध्यापक राम शिंदे यांनी सभापतीचे आसन स्विकारावे अशी विनंती निलम गो-हे यांनी केली. त्यांना पुढच्या बाजूने येण्यासाठी पाय-या नसल्यामुळे त्यांना मागच्या दाराने आणावे लागणार आहे. त्याच्यावर मी काही वेगळे भाष्य करणार नाही. शंभुराजे देसाई यांची इच्छा होती की त्यांना थेट पुढून आणावे. मात्र त्यासाठी आसन कापावे लागले असते. ते बरोबर झाले नसते असे निलम गो-हे म्हणाल्या. त्यानंतर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.
यानंतर सभापती राम शिंदे यांना त्यांच्या आसनापर्यंत नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर सभापती राम शिंदे हे मागच्या बाजूने येऊन आसनस्थ झाले. यावेळी त्यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले.