नागपूर : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच विधानसभेत भाषण करत विविध मुद्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित केल्या जाणा-या शंका दूर करत नवीन कोणतेही निकष न लावता ही योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत, अशी माहिती दिली. तसेच या योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता हे अधिवेशन संपताच जमा केला जाईल, असेही सांगितले आहे.
सभागृहात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणीही कसलीही शंका मनात ठेवू नये. आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत, ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवले, त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
लाडकी बहीण योजनेला नवीन निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जाईल, असा आरोप सरकारवर केला जात होता. हा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोडून काढला आहे. या योजनेसाठी नवीन कोणतेही निकष लावलेले नाहीत. फक्त काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे लक्षात येत आहे. काहींनी चार-चार बँक खाती तयार करून फायदा घेतला आहे. समाजात जसे चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतात, तसे काही वाईट प्रवृत्तीचेही लोक असतात. त्यामुळे अशा लोकांनी फायदा घेऊ नये याची आम्ही काळजी घेऊ. कारण हा जनतेचा पैसा आहे. मागच्या काळात आमच्या लक्षात आलं की, पुरुषानेच नऊ खाती काढून लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला. आता या पुरुषाला लाडकी बहीण म्हणायचे कसे? लाडका भाऊदेखील म्हणून शकत नाही. कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारणारा भाऊ लाडका असू शकत नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
महायुती आश्वासने पुर्ण करणार
महायुतीने शेतकरी, युवा, ज्येष्ठ, समाजातील वंचितांच्या संदर्भातील दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समाजघटकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
सरकारने केली आहे पैशांची तरतूद
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच महिला व बाल विकास विभागासाठी २,१५५ कोटी रुपये तरतूद केली असून, यात लाडकी बहीण योजनेसाठी १,४०० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. लाडकी बहीण योजनेत २.३४ कोटी महिला लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीपर्यंत ७,५०० रुपये आधीच देण्यात आले आहेत. महायुतीने ही मदत मासिक १५०० रुपयांवरून मासिक मदत २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नसल्याने पुरवणी मागण्यांत तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबरचे पैसे देण्यासाठी वापरली जाईल.
२१०० रुपयांबद्दल संभ्रम
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना गेम चेंजर ठरल्याने महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले. आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. खात्यात दीड हजार रुपये की २१०० रुपये जमा होणार याची चर्चा लाडक्या बहिणींमध्ये रंगली आहे.