22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधकांनी रडगाणे थांबवावे

विरोधकांनी रडगाणे थांबवावे

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

नागपूर : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर राजकीय आसूड ओढले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टीकास्त्र सोडले. काल सभागृहात पाहुणे कलाकार येऊन गेले. मीडीयासमोर रडगाणे गाण्यापेक्षा सभागृहात येऊन बाजू मांडली पाहिजे. काही लोक पार्टटाईम म्हणून सभागृहाचा वापर करतात. किसी को विरासत मे गद्दी मिलती है, पर हर किसी को बुद्धी नही मिलती. त्यांच्या डोळ्यात पराभवाचे पाणी आहे, त्यामुळे त्यांना जनतेचा जल्लोष दिसत नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी राजकीय चिमटे काढले.

गेल्या अडीच वर्षांत महायुतीने कल्याणकारी योजनांचे विक्रमी काम केले. एकही सुटी न घेता टीम म्हणून काम केले. त्यामुळे निकालात इतिहास घडला. आमच्या सरकारने २४ बाय ७ काम केले व घसरलेला राडा रुळावर आणला. महायुती सरकारची नवी इनिंग सुरू झाली आहे. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. निवडणूकीत विरोधकांना मतदारांनी आस्मान दाखविले. अडीच वर्ष विरोधकांनी शिव्याशाप दिले व आरोप केले. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हे सिद्ध झाले. गिरे तो भी टांग उपर अशीच विरोधकांची अवस्था आहे. विरोधी पक्षांवर जनतेने बहिष्कार टाकला आहे. त्यांना सगळे कळत आहे, पण वळत नाही. विरोधकांनी आता तरी रडगाणे थांबवायला हवे. आता त्यांनी आमच्यासोबत विकासाचे गाणे गावे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अडीच वर्षांअगोदर महाविकासआघाडीची भूमिका कल करे सो परसो असे काम होते. त्यांनी सगळेच बंद करण्यावर भर ठेवला होता व अगदी हसणे-जगणेदेखील बंद केले होते. बंदसम्राट घरात होते व फेसबुक लाईव्ह जोरात होते. आम्हाला घटनाबा सरकार म्हणणारे निवडणूक आयोग, विधीमंडळ, न्यायालय व जनतेच्या न्यायालयात हरले. जिंकता येईना ईव्हीएम वाकडे अशी विरोधकांची गत झाली आहे. पराभवाचे खापर फोडायला कुणीतरी हवे म्हणून ईव्हीएम आंदोलन सुरू आहे असा आरोप शिंदे यांनी लावला.

नवाबी सरकारपेक्षा गुलाबी सरकार चांगले
जे लोक फडणवीस यांना राजकारणातून संपविण्याची भाषा करत होते ते पुष्पगुच्छ घेऊन भेटीला पोहोचले. सरड्यापेक्षा वेगाने रंग बदलण्याची किमया ते करत आहेत. त्यांच्या नवाबी सरकारपेक्षा आमचे गुलाबी सरकार चांगले ठरले असे शिंदे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR