सोलापूर : १०-१५ दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपयांचा सरासरी दर होता. उच्चांकी दर सात हजारांपर्यंत मिळत होता. पण, आता आवक तेवढीच असताना देखील कांद्याचे सरासरी दर तब्बल दोन हजार रुपयांनी घसरल्याची स्थिती पहायला मिळत आहे.कांद्याला १८०० रुपयांचा सरासरी दर मिळत आहे.दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.पावसाळ्यात जागेवरच खराब झालेला कांदा काढून शेतकऱ्यांनी नवीन कांद्याची लागवड केली. त्यातून चार पैसे हाती पडतील, नुकसान भरून निघेल हा त्यामागील हेतू आहे. मात्र, कांद्याचे दर अचानकपणे कमी झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. यंदा गतवर्षीपेक्षा कांद्याची आवक निम्म्याने कमीच आहे, तरीदेखील समाधानकारक भाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांना आहे.
सोलापूर बाजार समितीत समाधानकारक दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी बेंगलोर बाजारात धाव घेत आहेत. त्याठिकाणी जायला गाडी भाडे जास्त आहे, पण भाव देखील सरासरी तीन हजारांपर्यंत मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. गुजरात, आंध्र प्रदेशातील कर्नुल, लासलगाव, पुणे आणि नगर येथे कांदा आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सोलापुरातील भावात घरसण झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांत भाव वाढेल, असा विश्वासही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.