केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. आंबेडकरांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. काँग्रेसने या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती राग आहे हे अमित शहा यांच्या विधानावरून कळून येते, अशी टीका काँग्रेसने केली. संसदेच्या बाहेर काँग्रेस खासदारांनी आंदोलन केले. हातात बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. राज्यात नितीन राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी हा प्रश्न उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्यावर कारवाईची मागणी केली.
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राजद, डावे पक्ष आणि शिवसेना (उबाठा) यांनी शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढविल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बुधवारी दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. अमित शहा मंगळवारी राज्यसभेत म्हणाले की, आजकाल आंबेडकर-आंबेडकर-आंबेडकर असा नारा देण्याची फॅशन झाली आहे. तुम्ही एवढे देवाचे नाव वारंवार घेतले असते तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता. आंबेडकरांचे नाव घेत आहात याचा आनंद आहे. तुम्ही आंबेडकरांचे नाव आणखी १०० वेळा घ्या; पण तुमच्या आंबेडकरांबद्दल काय भावना होत्या हे मला सांगायचे आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी शहा यांच्याविरुद्ध राज्यसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे तर दिल्लीत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर जमून ‘शहा माफी मांगो, शहा शर्म करो’ अशी घोषणाबाजी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्यासोबत सर्व खासदारांनी डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र हातात घेत संसद भवनात सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
अमित शहा यांचा बोलविता धनी कोण? भाजप की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ? अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व संघावर निशाणा साधला. भाजपचे उर्मट नेते हे महाराष्ट्राच्या दैवतांचा सातत्याने अपमान करीत आहेत. भाजपचे ढोंग आता समोर आले आहे. भाजपचे हिंदुत्व म्हणजे ‘मँुह मे राम और बगल मे छुरी’ असे असल्याचा टोलाही उद्धव यांनी लगावला. भाजपला महाराष्ट्र संपवायचा आहे. आपल्याशिवाय दुसरे कोणीही देशात जन्माला आलेच नाही, असे त्यांना दाखवून द्यायचे आहे. आधी नेहरूंचे नाव घेत टीका करत होते, आता हे बाबासाहेब आंबेडकरांवर बोलू लागले आहेत. भाजपला पाठिंबा देणारे नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू काय करत आहेत? असा सवालही त्यांनी केला. भगतसिंग कोश्यारी नावाचे एक गृहस्थ राज्यपाल म्हणून बसवण्यात आले होते. त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचाही अपमान केला होता मात्र, भाजपने त्यांना माफी मागावयास लावली नव्हती किंवा पदावरून हटवले नव्हते. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव आहे.
अमित शहा यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यावर पंतप्रधान मोदी त्यांच्या मदतीला धाऊन गेले. ‘एक्स’वर लागोपाठ सहा ट्विट करत पंतप्रधान म्हणाले, काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला वाटते की, त्यांच्या दुष्ट अपप्रचारामागे त्यांनी गेले अनेक वर्षे केलेले गैरप्रकार लपतील. डॉ. आंबेडकरांचा वारसा नष्ट करण्यासाठी आणि अनुसूचित जाती व जमातींना अपमानीत करण्यासाठी एका कुटुंबाच्या ताब्यात असणा-या पक्षाने अनेक कुटील युक्त्या केल्या हे भारतातील जनतेने वारंवार पाहिले आहे. काँग्रेसने दोन वेळा आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला. पंडित नेहरू यांनी आंबेडकर यांच्या विरोधात प्रचार करून त्यांचा पराभव करणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला. त्यांना भारतरत्न नाकारले, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या छायाचित्राला स्थान दिले नाही. डॉ. आंबेडकरांचा काँग्रेसने सतत अपमान केला. अनुसूचित जाती व जमातीविरोधात भीषण हत्याकांड त्यांच्याच काळात झाले. संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसने केलेल्या कृष्ण कृत्यांचा इतिहास उघड केला.
अमित शहा यांनी मांडलेल्या तथ्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे त्यामुळेच त्यांनी ही नाटके सुरू केली आहेत; पण त्यांच्या दुर्दैवाने लोकांना सत्याची पूर्ण कल्पना आहे. पंतप्रधानांच्या ट्विटनंतरही विरोधक आक्रमकच राहिले. सायंकाळी अमित शहा यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याची सारवासारव केली. राज्यसभेत आपण जे वक्तव्य केले त्याचा विपर्यास करण्यात आला. आपले वक्तव्य तोडून-मोडून सादर करण्यात आले. काँग्रेसने तथ्याची मोडतोड केली असून त्याचा आपण निषेध करतो, असे शहा म्हणाले. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा अपमान केला, आरक्षणाला विरोध केला, काँग्रेस तथ्य मोडून-तोडून सादर करीत आहे. हे केवळ डॉ. आंबेडकर यांच्या विरोधातीलच नसून ते घटनेच्या मूल्यांविरोधात आहे, असेही ते म्हणाले. माध्यमांना आपली विनंती आहे की, आपण केलेले पूर्ण विधान जनतेसमोर ठेवा. आपण अशा पक्षामध्ये आहोत की जेथे कधीही डॉ. आंबेडकरांचा अपमान केला जाणार नाही. डॉ. आंबेडकरांना काँग्रेसने नेहमीच विरोध केला. काँग्रेसनेच देशात आणीबाणी लागू केली. पंडित नेहरू डॉ. आंबेडकरांचा तिरस्कार करायचे हे जगजाहीर आहे.
आपण राजीनामा दिला तरी काँगे्रस दलदलीतून बाहेर येणार नाही कारण पुढील १५ वर्षे भाजपच सत्तेत राहणार आहे. काँग्रेस विरोधी पक्षातच राहणार आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आपल्या युक्तिवादावर खुश असले तरी वास्तव हे की, ते ‘काँग्रेस फोबिया’ने पछाडले गेले आहेत. जिथे तिथे त्यांना काँग्रेस पक्षच दिसतो. काँग्रेसने केलेल्या चांगल्या गोष्टी मात्र त्यांना अजिबात दिसत नाही. दुस-याकडे बोट दाखवताना चार बोटे आपल्या दिशेने असतात हे त्यांना दिसतच नाही. लक्षातच येत नाही. काँग्रेसच्या कार्यकाळात भीषण हत्याकांड घडले; परंतु दोन वर्षापासून मणिपूर जळत आहे ते मात्र दिसत नाही! चांगल्याला चांगले म्हणण्याची नियतच नसेल तर दुसरे काय होणार? दुस-याच्या ताटातले कुसळ दिसते पण…!