19.1 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमहाराष्ट्रजयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ, विरोधक धास्तावले

जयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ, विरोधक धास्तावले

इस्लामपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भूमिकेवर इस्लामपूर मतदारसंघातील सर्वच पक्षाचे नेते अस्वस्थ झाले आहेत. पाटील यांच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी सध्यातरी आपले देव पाण्यात घातलेले आहेत. शहरातील एका कार्यक्रमात सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते. पाटील यांनी महायुतीत प्रवेश केल्यास आपले भवितव्य काय? असा अस्वस्थ करणारा प्रश्न भाजप, राष्ट्रवादी व शिंदेसेनेतील स्थानिक नेत्यांना पडला आहे. परंतु, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याच्या पाटील यांच्या संदिग्ध भूमिकेने समर्थक मात्र मौन बाळगून आहेत.

सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आले नाही. यावर राजकीय वर्तुळात विविध पक्षातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषत: सांगली जिल्ह्याचे मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठीच राखून ठेवल्याचे मतदारसंघातून चर्चेले जात आहे. परंतु, भाजप किंवा राष्ट्रवादी (अजित पवार) यापैकी एका पक्षात जयंत पाटील प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त होतोय. मात्र, पाटील यांच्या मौनाच्या भूमिकेमुळे इस्लामपूर मतदारसंघातील त्यांचे विरोधक अस्वस्थ झाले आहेत.

जयंत पाटील समर्थकांचे मौन
माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या घरगुती कार्यक्रमात सर्वच पक्षातील नेते एकत्र आले होते. यामध्ये जयंत पाटील यांच्या समर्थकांनी मौन पाळले, तरी आमच्यापेक्षा विरोधी पक्षातील नेत्यांना पाटील यांच्या संदिग्ध भूमिकेची काळजी लागून राहिली आहे. पाटील हे महायुतीत सामील झाल्यास आमच्या राजकीय भवितव्याचे काय होणार, असा प्रश्न विरोधकांना पडला आहे.

जानेवारीत निर्णयाची शक्यता
सध्या नागपूर येथे अधिवेशन सुरू आहे. आ. जयंत पाटीलही अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल वेगवेगळ्या चर्चा असल्या तरी जानेवारी महिन्यात आ. पाटील योग्य निर्णय घेतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR