19.1 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeलातूरलातूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे ३ वर्षांत २० धक्के 

लातूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे ३ वर्षांत २० धक्के 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील किल्लारी व परिसरात ३० सप्टेंबर १९९३ रोजी प्रलयकारी भूकंप झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात अधुनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतात. २०२२-२०२३ मध्ये १५ तर २०२४ मध्ये २ असे तीन  वर्षांत भूकंपाचे २० धक्के बसल्याची नोंद लातूरमधील भूकंपमापन केंद्रात झाली आहे. मात्र नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन भूकंपमापन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र या गुढ आवाजाने भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या केल्या.
लातूर जिल्ह्यात २०२२ मध्ये भूकंपाच्या १३ घटना घडल्या होत्या. यामध्ये भूकंपाची तीव्रता १.४ पासून ३.१ रिश्टर स्केलपर्यंत होती. या घटना २०२३ मध्ये कमी घडल्याची नोंद आहे. या वर्षात भूकंपाचे ५ धक्के बसले तर २०२४ मध्ये त्यापेक्षा कमी म्हणजे केवळ दोन धक्के बसले. ३० सप्टेंबर १९९३ च्या प्रलयकारी भूकंपानंतर लातूर जिल्ह्यात भूकंपाविषयी कमालीची भीती नागरिकांमध्ये आहे. या भूकंपानंतर सातत्याने सौम्य स्वरुपाचे भूकंपाचे धक्के बसत आले आहेत. त्यामुळे भूगर्भातील आवाज असो की सौम्य स्वरुपाचा भूकंप असो नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.
निलंगा तालुक्यातील हासोरीसह उस्तूरी आणि हरीजवळा गाव परिसरात दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी भूकंपाचे दोन धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता १.६ रिश्टर स्केल नोंदली गेली होती. त्यानंतर दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी दिवसभरात हासोरी येथे भूकंपाचे तीन धक्के बसले होते. ४ ऑक्टोबर रोजी पुन्हा हासोरी भूकंपाने हादरले होते.  याच वर्षात सप्टेंबर महिन्यात लातूर शहराच्या पूर्व भागात भूगर्भातून गुढ आवाज आला होता. या आवाजाने जमीन हादरली होती. नागरिक भयभीत झाले होते.
दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने भूकंप नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रामध्ये लातूर जिल्हा व परिसरात कोठे भूकंप झाला का, याची पडताळणी आपत्ती व्यवस्थापनाने केली होती. मात्र लातूर जिल्ह्यात कोठेही भूकंप झाल्याची नोंद या केंद्रावर झाली नव्हती. मात्र लातूर शहराच्या विवेकानंद चौक परिसरात झालेल्या गुढ आवाजाची चर्चा संपूर्ण शहरभर पसली होती. हा भूर्गातील हालचालींचा आवाज असावा, असा निष्कर्ष आपत्ती व्यवस्थापनाने काढला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR