सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नव्या पेठेतील दोन कपड्यांच्या दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात दुकानातील कपडे जळून खाक झाले. त्याची झळ बाजूलाच असलेल्या दुकानांनाही बसली.
पोलिसांचे प्रसंगावधान आणि अग्निशामक दल घटनास्थळी वेळीच दाखल झाल्याने इतर दुकानांचे नुकसान आणि मोठी दुर्घटना टळली. मनोहर दासरी व जय पवार यांच्या मालकीची ही दुकाने असून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या दोन्ही दुकानाच्या जवळच विद्युत डीपी आहे. याठिकाणच्या डीपीमध्ये वारंवार शॉर्टसर्किट होते. यामुळेच ही आग लागली. दोन्ही दुकानाचे झालेले आर्थिक नुकसान भरपाई महावितरण कंपनीने भरून द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करु असे व्यार्पायांनी सांगितले.