मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान करणा-या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवसी दिल्लीत होणा-या संचलनात परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी दिल्लीतील राजपथावर होणा-या प्रतिष्ठेचआ संचलनासाठी यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील चित्ररथांना पथसंचलनाची परवानगी देण्यात आली आहे. पण या यादीत सद्या तरी महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही.
नवी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर तीनही सैन्यदलांसाठी वेगवेगळ्या राज्यातील चित्ररथांच्या कार्यक्रमाचा सहभाग असतो. गेल्या वर्षी राज्य सरकारने ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ तयार केला होता. पण २०२५ मध्ये मात्र महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान गेल्या वर्षी ३५० व्या शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ तयार करण्यात आला होता. २०२४ मध्ये मराठी रंगभूमीच्या १७५ व्या सुवर्णमयी इतिहास उलगडणारा चित्ररथ सादर करावा असा प्रस्ताव राज्य सरकारद्वारे मांडण्यात आला. ऐनवेळी या प्रस्तावाला मान्यता देखील मिळाली. २०२३ मध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आणि नारीशक्तीवर आधारित आधारलेल्या चित्ररथाचे संचालन करण्यात आले होते.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर होणारा चित्ररथाचा कार्यक्रम हा प्रत्येक राज्यासाठी आणि केंद्रसाशित प्रदेशासाठी महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा असतो. यावरून अनेकदा वादही होतात, या तक्रारीनंतर, प्रत्येक राज्याला तीन वर्षांतून एकदा तरी चित्ररथ सादर करण्याची संधी मिळेल, असा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. पण संरक्षण मंत्रालयाने नेमलेल्या समितीला हा चित्ररथ पंसत पडला पाहिजे, अशी अटही ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, २०२५ च्या चित्ररथ संचालनाच्या यादीत महाराष्ट्राला सध्यातरी स्थान मिळाले नसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, झारखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड हरियाणा, आंध्र प्रदेश, ही राज्ये आहेत. याशिवाय दीव-दमण, दादरा आणि नगरहवेली, आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांना परवागनी देण्यात आली आहे.