सोलापूर : बालविवाह ही प्रथा समाजाला लागलेला कलंकच असून ही प्रथा बंद व्हावी, म्हणून १ नोव्हेंबर २०१७ पासून प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र, ही प्रथा अजूनही सुरुच आहे. दरवर्षी सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांकडे सरासरी दोन हजार विवाहिता सासरच्यांविरूद्ध छळाच्या तक्रारी करतात. चिंतेची बाब म्हणजे त्यात नवविवाहितांचे प्रमाण लक्षणीय आहे.
जिल्हा महिला व बालकल्याण कक्ष, ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा, अशा वेगवेगळ्या स्तरावर बालविवाह थांबविणाऱ्या यंत्रणा कार्यरत आहेत. पोलिस व आरोग्य यंत्रणादेखील त्यासाठी पूरक आहे. तरीसुद्धा बालविवाह पूर्णतः थांबलेले नाहीत. बालविवाहानंतर किती मुली गर्भवती आहेत किंवा माता झाल्या आहेत, याची आकडेवारी कोणत्याही यंत्रणेकडे नाही.
अल्पवयीन मुलीचा विवाह उरकल्यानंतर तिला कौटुंबिक, शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तिचे आयुष्यमान कमी होते, पतीचा अचानक मृत्यू झाल्यास अतिशय कमी वयात ती विधवा होते अशीही उदाहरणे पाहायला मिळतात. कौटुंबिक वादातून तिला अनेक वर्षे माहेरी राहावे लागते. विवाहानंतर काही दिवसांतच सासरचे लोक विवाहात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही, महागड्या वस्तू दिल्या नाहीत, माहेरून पैसे आण म्हणून छळ करतात, असेही पोलिसांत तक्रारीवरून स्पष्ट होते. शिक्षण घेण्याच्या वयात विवाह लावून तिच्या आयुष्याचे बरबाद करण्याचा हा प्रकार कधी थांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गाव असो वा शहरातील शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुली अचानक गैरहजर राहतात. पुढे त्या मुली शाळेत येतच नाहीत. दहावी- बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरताना देखील ही आकडेवारी स्पष्ट होते. तरीपण, संबंधित शाळा-महाविद्यालयांना ती मुलगी शाळेला का येत नाही याचा शोध घेतला जात नाही. चिंतेची बाब म्हणजे आठवी ते बारावीतून शाळा सोडणाऱ्या मुलींची संख्या लक्षणीय असतानाही अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक गप्प बसतात, त्यामागे नेमके कारण काय, हा संशोधनाचा विषय बनला आहे.
गर्भवती मातांची तपासणी आरोग्य केंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये केली जाते. त्यावेळी अनेकदा रूग्णालयातील कर्मचारी संबंधित गर्भवती किंवा तिच्यासोबत आलेल्या नातेवाईकाने सांगितलेली तोंडी तारीख नोंदवहीत लिहतात. काहीवेळा आधारकार्डवरील तारखा बदलून आणल्या जातात, असे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले. अशा गंभीर बाबींना पायबंद कधी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.