मुंबई : (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे अस्तित्वाची लढाई लढण्याचे आव्हान उभे आहे. पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करायचा असेल तर येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकावीच लागेल. ही निवडणूक पक्षासाठी अस्तित्वाचीच लढाई ठरणार आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जानेवारी महिन्यापासून उदधव ठाकरे स्वत: शाखापातळीवर भेटी देणार असून शाखाप्रमुखांपासून स्थानिक पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक स्बबळावर लढवावी असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भातही उद्धव ठाकरे शिवसैनिकांची मने जाणून घेणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिवसर्वेक्षण यात्रा करण्यात आली होती. पक्षातर्फे नेमण्यात आलेल्या निरिक्षकांनी आपला अहवाल सादर केला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आता उदधव ठाकरे विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत. मुंबईतील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिका-यांच्या बैठका स्वत: उदधव ठाकरे घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान नेमक्या कोणत्या चुका झाल्या. आता पुढची रणनिती काय आखायची याचा आढावा या बैठकीतून घेण्यात येणार आहे.
स्वबळाची तयारी सुरू झाल्याची चर्चा
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या शिवसेना उदधव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहेत. एकप्रकारे पक्षासाठी ती अस्तित्वाचीच लढाई असणार आहे. त्यामुळे उदधव ठाकरे यांनी त्याच्या तयारीला अतिशय गांभीर्याने घेतले आहे. उदधव ठाकरे स्वत: शाखापातळीवर भेट देउन शाखाप्रमुख तसेच स्थानिक पदाधिकारी यांची भेट घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुका कशा लढायच्या आघाडी करून की स्वबळावर या बाबत देखील ते शिवसैनिकांची मने जाणून घेणार आहेत.