नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी हल्लीच बांगलादेशी घुसखोरांना भारतीय ओळखपत्र मिळवून देणा-या एका मोठ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यामध्ये पाच बांगलादेशी नागरिक आणि बनावट कागदपत्रे तयार करणा-या सहा जणांचा समावेश आहे.
दक्षिण दिल्लीतील संगम विहार येथे झालेल्या एका हत्येचा प्रकरणाचा तपास करत असताना या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दक्षिण दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी अंकित चौहान यांनी सांगितले की, सेटों शेख नावाच्या एका व्यक्तीची हत्या वाद आणि पैशांच्या देवाण घेवाणीमधून करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हत्या झालेला सेटों शेख हा बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट आधारकार्ड तयार करायचा, अशी माहिती समोर आली आहे.
तपासामध्ये बांगलादेशींची भारतात घुसखोरी कशी घडवली जायची, याबाबतची माहितीही समोर आली आहे. ही गँग बांगलादेशी नागरिकांना जंगलाच्या माध्यमातून भारतामध्ये आणायची. भारतात आल्यानंतर त्यांना सिमकार्ड आणि काही रोख रक्कम दिली जायची. कागदपत्रं तयार करण्यासाठी जनता प्रिंट्स नावाच्या एका बनावट संकेतस्थळाची मदत घेतली जायची. ही वेबसाईट रजत मिश्रा नावाची व्यक्ती २०२२ पासून चालवायची. तसेच केवळ २० रुपयांमध्ये आधारकार्ड, मतदार कार्ड आणि पॅनकार्ड यासारखी कागदपत्रे प्रिंट करून द्यायचा. पोलिसांनी या रॅकेटची प्रमुख असलेल्या मुन्नी देवी हिलाही अटक केली आहे. तपासामध्ये ४ बनावट मतदार कार्ड, २१ आधारकार्ड आणि ६ पॅनकार्ड जप्त केले आहेत.