24.5 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरमुंडे-कराड यांच्यात पार्टनरशिप!

मुंडे-कराड यांच्यात पार्टनरशिप!

दमानियांनी दिले पुरावे, विरोधकही मुंडेविरोधात आक्रमक

दमानियांनी दिले पुरावे, विरोधकही मुंडेविरोधात आक्रमक
बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्याकांडामुळे राज्यात संतापाची लाट आहे. या प्रकरणामुळे बीडमधील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा मास्टर माईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मैदानात उतरल्या असून, त्यांनी थेट धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक हितसंबंध उघड केले आहेत. त्यांचा एकत्रित व्यवसाय असून, त्यांच्या नावे जवळपास ८० हेक्टर जमीन आहे. तसेच कंपन्याही आहेत, असे सांगत शेतीचा सातबाराही जारी केला.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव सातत्याने समोर येत असून तोच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असल्याचाही आरोप होत असून त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले जात आहे. खुद्द धनंजय मुंडेंनी यासंदर्भातील आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत मोठा दावा करणारी काही कागदपत्रे आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केली. ही कागदपत्रे म्हणजे जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे असून त्यात धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांची संयुक्त मालकी असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी शेअर केलेल्या सातबा-यांमध्येही इतर काही नावांसोबत धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांचीही नावे दिसत आहेत. दरम्यान, दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात एकत्रित व्यवसाय असल्याचे म्हटले.

सरपंच देशमुख यांची निर्घृण हत्या करणा-या माणसांना आपण माणसं म्हणून शकत नाहीत. ही अक्षरश: हैवान आहेत. यांच्या विरोधात लढा उभा केला नाही तर प्रत्येक जिल्ह्यात असले राजकारण सुरू होईल, त्यामुळे देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि वाल्मिक कराडला अटक करावी, या मागणीसाठी त्या बीडमध्ये ठाण मांडून बसणार असून, शनिवारी बीडमध्ये पदयात्रा काढली जाणार आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

मुंडे-कराड यांची
जमीन, कंपनी एकत्र
धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे, याचे धडधडीत पुरावे मिळाले आहेत. त्यांची कंपनी एकत्र, जमीन एकत्र, जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे मी ऑनलाईन डाऊनलोड केले आहेत. ही ३५५४ गुंठे जमीन आहे, असे अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. अंजली दमानिया यांनी केलेली ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

कैलास फडविरुद्ध गुन्हा
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हीडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणावरून धनंजय मुंडेंना घेरले जात असताना या व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी कैलास फडविरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR