16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeपरभणीपोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सुर्यवंशींचा मृत्यू

पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सुर्यवंशींचा मृत्यू

परभणी : पोलिसांनी लॉकअपमध्ये अमानुषपणे मारहाण केल्यामुळेच सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला असून मारहाण करणा-या पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने येत्या महिनाभरात सुर्यवंशी कुटुंबियांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सोमवार, दि. ३० रोजी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले हे सोमवारी परभणी जिल्हा दौ-यावर आले होते. त्यांनी परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच न्यायालयीन कोठडीत मरण पावलेला सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांना परभणीत झालेल्या संपुर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यात आली. दरम्यान, ह्दयविकाराने निधन झालेले लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुंटुंबियांची आठवले यांनी भेट घेऊन सांंत्वन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी नागोराव कदम, विजय सोनवणे, पप्पू कागणे, दिलीप जोशी, डी. एन.दाभाडे, डॉ. सिध्दार्थ भालेराव, जिल्हाध्यक्ष डॉ.विजय गायकवाड आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना केंंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले की, आंदोलन दरम्यान पोलिसांचे फोटो काढत असताना भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांना पकडून लॉकअपमध्ये टाकण्यात आले. त्यांचा आंदोलनात सहभाग नव्हता असे कुटुंबियांकडून कळले आहे. त्यांना कुठलाही आजार नव्हता असे कुटुंबियांचे म्हणणे असल्याचेही त्यांनी सांगितले. मारहाण केलेल्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात आपण पोलिस अधिक्षकांशी बोललो असून हा विषय न्यायालयाकडे आहे, न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तात्काळ कारवाई होईल असेही ते म्हणाले.

‘तो’ मनोरुग्न नाही
पोलिसांनी अनेकांना घरातून ओढून नेऊन केलेल्या मारहाणीत जवळपास १४ तरूण-तरूणी जबर जखमी झालेले आहेत. या मारहाणीची देखील चौकशी व्हावी. सुर्यवंशी कुटुंबाला सरकारकडून चांगली मदत मिळायला हवी आणि त्याच्या एका भावाला शासकीस नोकरी देण्याची कुटुंबाची मागणी आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. भारतीय संविधान प्रतिकृतीचा अवमान करणारा आरोपी मनोरूग्ण नसून त्याने हा प्रकार ठरवून केला असल्याचा आरोप करत त्याचीही कसून चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. समाजासाठीच काम केलेल्या लोकनेते दिवंगत विजय वाकोडे यांच्या एका मुलाला शासकीय नोकरी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR