18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रशॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार; मीरारोड हादरले

शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार; मीरारोड हादरले

भाईंदर : मीरारोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरारोड परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. कालच नवी मुंबईतील सानपाड्यात गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर आता मीरारोडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये एका तरुणाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.

मीरारोडच्या शांती शॉपिंग सेंटरच्या बी विंग भागात शम्स सब्रीद अन्सारी ऊर्फ सोनू (३५) हा साहित्य विकायचा. शुक्रवारी रात्री दुकान बंद करून शम्स बाहेर उभे होते. त्यावेळी चेह-यावर कापड गुंडाळलेल्या हल्लेखोराने शम्स यांच्या डोक्यात गोळी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाडसह नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमर जगदाळेसह अन्य अधिकारी व कर्मचारी, मीरा-भाईंदर गुन्हे शाखा युनिट १ चे निरीक्षक अविराज कुराडे, अधिकारी, कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शम्स हा एका गुन्ह्यात साक्षीदार होता. त्याला धमक्या दिल्या जात होत्या व तशी तक्रार त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या घटनेमागे युसूफ नावाच्या इसमाचे नाव येत आहे. पोलिस संशयित युसूफचा शोध घेत आहेत. अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.

युसूफ हा शम्सला सतत धमक्या देत असल्याची माहिती समोर आली आहे. युसूफचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. सध्या नयानगर पोलिस आणि मीरा-भाईंदर गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. तसेच हल्लेखोराने वापरलेल्या मार्गांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी शम्सच्या कुटुंबीयांकडूनही माहिती घेतली असून, हल्ल्याशी संबंधित पुरावे शोधण्यासाठी स्थानिकांना देखील चौकशीसाठी बोलावले आहे. या घटनेमुळे मीरारोड परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी या घटनेतील दोषींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

याआधी, २ जानेवारीला नवी मुंबईतील सानपाडा येथे देखील गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासांत मीरारोडमध्ये अशी घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सतत होणा-या हिंसाचाराच्या घटनांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना घाबरू नये असे सांगितले असून, कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या हत्याकांडातील दोषींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR