18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रवडापाव, पराठ्यासह पदार्थांच्या वाढल्या किमती

वडापाव, पराठ्यासह पदार्थांच्या वाढल्या किमती

पुणे : प्रतिनिधी
शनिवार-रविवार आला की पुण्यातील विविध भागांतील रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि हातगाड्यांवर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र पुणेकरांना आता जिभेचे लाड थांबवावे लागण्याची शक्यता आहे. कांद्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नववर्षातच हॉटेलसह हातगाड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पदार्थांच्या किमतीत वाढ केल्याचा फटका खवय्यांना बसणार आहे.

मागील महिन्यापासून एक महिन्याच्या कालावधीत कडधान्यांमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांचे दरही प्रति किलो ७ ते १५ रुपयांनी वाढले आहेत, तर तूर, मसूर, मूग, हरभरा या डाळींनी शंभरी पार केली आहे. इतकेच काय तर तेलाचे भाव २ ते ३ रुपयांनी काहीसे कमी झाले असले तरी तेलाचे भावही १ लिटर १४० ते १४५ रुपये झाले आहेत. कांद्याच्या भाववाढीने हॉटेल व्यावसायिकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

भाजी किंवा वडापाव भाजी या पदार्थांमध्ये कांदा लागत असल्याने छोट्या व्यावसायिकांनी वडापावच्या दरात ३ ते पाच रुपयांनी वाढ केली आहे. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे ५ ते ७ रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. खानावळीमध्येही काही पदार्थ महागले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे.

खानावळीचे दर वाढले :

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतात हॉटेल व खानावळ तसेच घरगुती खानावळ चालकांनी दरात वाढ केली असून, ही दरवाढ सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने आता घरगुती खानावळीमध्ये जेवण करणे अवघड झाले आहे. घरगुती खानावळ राईस प्लेट दर ७० वरून ९० रुपये, तर हॉटेलमधील ११० वरून १३० रुपये झाल्याने वाढत्या महागाईला सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR