15.4 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeसोलापूरसोलापूर मीडिया चषकावर ‘डिजिटल’ची मोहोर

सोलापूर मीडिया चषकावर ‘डिजिटल’ची मोहोर

सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (सावा) यांच्या वतीने आयोजित सोलापूर मीडिया कप २०२५च्या अंतिम सामन्यात डिजिटल मीडिया संघाने सावा संघाला पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सावा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल (रेल्वे मैदान) येथे आयोजित या स्पर्धेत लोकमत, दिव्य मराठी, सकाळ, संचार, तरुण भारत संवाद, श्रमिक पत्रकार संघ, सावा, मेट्रो सोलापूर, डिजिटल मीडिया आणि फोटो व्हीडीओग्राफर या दहा संघांचा यात समावेश होता.

अंतिम सामना डिजिटल मीडिया विरूद्ध सावा या संघात झाला. प्रथम फलंदाजी करताना सावा संघाने निर्धारित ६ षटकांत ६ बाद १८ धावा केल्या. प्रत्युत्तरात डिजिटल मीडिया संघाने हे आव्हान अवघ्या १.१ षटकात २१ धावा करत पूर्ण केले आणि १० गडी राखून एकतर्फी दणदणीत विजय मिळविला. धनंजय जाधव हा सामनावीर ठरला. स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन व मालिकावीरचा किताब स्वप्निल म्हेत्रसकर (सावा) याने पटकाविला. बेस्ट बॉलर इब्राहिम मुजावर (डिजिटल मीडिया) व बेस्ट फिल्डर सुभाष कलशेट्टी (श्रमिक पत्रकार संघ) यांना गौरविण्यात आले. अंतिम सामना एकतर्फी झाला असला तरी स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने मात्र उच्चांकी धावसंख्येचे आणि चुरशीचे झाले होते. चारही संघांच्या फलंदाजांनी अक्षरश: षटकार व चौकारांची आतिषबाजी करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.

सोलापूरचा पूत्र तथा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णी याच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, माजी नगरसेवक अनंत जाधव, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी विजयकुमार सोनकुसरे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, ‘सावा’चे अध्यक्ष संतोष उदगिरी, सचिव अक्षय जव्हेरी, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, संयोजन सदस्य आफताब शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तो सर्वांनाच आनंद देतो. अलिकडच्या काळात क्रिकेटची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. स्पर्धेपुरते न खेळता क्रिकेट नियमित खेळले पाहिजे, असे सांगून अर्शिन कुलकर्णीने विजेत्यांना व स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR