बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. सीआयडीने या आरोपीच्या शोधासाठी पथक तयार केली आहेत. महाराष्ट्र शेजारील राज्यात तपास सुरू आहे. दरम्यान, आता खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या विष्णू चाटे याच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे.
मस्साजोग येथे असलेल्या पवन चक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विष्णू चाटे याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आजही कोर्टाने चाटे याच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. न्यायालयाने विष्णू चाटे याला १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपींची संख्या आठवर
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे याच्यासह देशमुख यांचे लोकेशन देणा-या तिस-या आरोपीला शुक्रवारी रात्री बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दोघे पुण्यातून तर एकाला कल्याणमधून अटक केली. आता या प्रकरणात आरोपींची संख्या आठ झाली असून अजूनही कृष्णा आंधळे मोकाटच आहे.
आंधळे फरारच
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आतापर्यंत सात आरोपी होते. त्यातील चौघे अटकेत होते. परंतु सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तीनही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर त्यातील घुले व सांगळे यांना शनिवारी पहाटे पकडण्यात यश आले आहे. आंधळे अजूनही फरार आहे तर दुस-या बाजूला सरपंच संतोष देशमुख यांचा ठावठिकाणा देणारा सिद्धार्थ सोनवणे आठवा आरोपी झाला आहे. एकूण अटक आरोपींची संख्या सात झाली आहे.