सोलापूर : मालतारण कर्ज घेतले, मात्र तारण साखरेची बँकेच्या परस्पर विक्री केली. साखर विक्रीतून आलेली रक्कम मालतारण कर्जापोटी जमा न करता इतर कर्ज खात्यावर भरली. मालतारण कर्ज ४२ कोटी २५ लाख ४९ हजार ४८४ रुपये व त्यावरील व्याजाची बँकेची फसवणूक केल्याची फिर्याद बार्शी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी सुधीर सोपल, योगेश सोपल यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक बार्शी मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी राहुल लक्ष्मण खुने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश सुधीर सोपल, विलास दगडू अप्पा रेणके, सुधीर गंगाधर सोपल, अलका सुधीर सोपल, उज्ज्वला योगेश सोपल (रा. सर्व बार्शी), अविनाश वसंतराव भोसले, राजू वसंतराव भोसले (कर्नाटक), श्रीकांत गोपाळ नलवडे (हुपरी, कोल्हापूर), आर. एस. उंबरदंड (बार्शी), बँक इन्स्पेक्टर व्ही. एस. आगलावे (आगलावे बावीस, बार्शी) यांच्यावर ४२०, ४०८, ४०९, १२० ब, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, खामगाव (बार्शी) येथील आर्यन शुगर या साखर कारखान्याला मालतारण कर्ज दोन टप्प्यांत (२०१२ व २०१३ मध्ये) ४५ कोटी ७९ लाख ७७ हजार रुपये उचलले. साखर तारणावर कर्ज उचलले असता, साखर गोडाऊनमध्ये ठेवल्यानंतर त्याची एक चावी बँक व एक चावी कारखान्यांकडे ठेवायला हवी. मात्र, साखर कारखाना संचालक मंडळाने तारण साखरेची परस्पर विक्री केली. त्यासंबंधीचा साखर परस्पर विक्रीचा अहवाल २१ डिसेंबर २०२४ रोजी देण्यात आला.
या अहवालाच्या आधारे आर्यन साखर कारखान्याचे संचालक मंडळ व तत्कालीन बँक इन्स्पेक्टर विरोधात पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.आर्यन शुगर कारखान्याने साखर विक्रीतून आलेली रक्कम प्रथम बँकेत मालतारण कर्ज खात्यावर भरणा करायला हवी. मात्र, साखर विक्रीतून आलेल्या ४८ कोटी २७ लाख ११ हजार ५६० रुपयांपैकी १२ कोटी ९९ लाख ७२ हजार १४३ रुपये मालतारण कर्ज खात्यावर, ३१ कोटी ७७ लाख ३९ हजार ४१७ रुपये कारखान्याच्या अल्पमुदत व दिर्घमुदत कर्जाच्या व्याजात जमा केली. तसेच, दोन कोटी रुपये दिर्घ मुदत कर्ज मुद्दल व दीड कोटी अल्पमुदत कर्जात जमा केले. मालतारण कर्ज ४२ कोटी २५ लाख ४९ हजार ४८४ रुपये पेंडिंग ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.