ओटावा : भारतासोबत पंगा घेणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची अखेर विकेट पडली असून जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत खासदारांच्या दबाव आणि लिबरल पक्षातील लोकप्रियता कमी झाल्यामुळे जस्टिन ट्रुडो यांना हे पाऊल उचलावे लागले.
जस्टिन ट्रुडो हे २०१५ पासून कॅनडाचे पंतप्रधान होते. तथापि, ट्रुडो ताबडतोब पायउतार होतील की नवीन नेता निवडून येईपर्यंत पंतप्रधान राहतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लिबरल पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी नेतृत्वाच्या मुद्यांवर निर्णय घेईल आणि त्याची बैठक या आठवड्यात होणार असल्याचं अहवालात म्हटले आहे.
नवीन नेता निवडेपर्यंत ट्रुडो हे पदावर राहतील अशी अपेक्षा आहे. लिबरल पक्षातील एका सूत्राने सांगितले की, पुढील नेत्याचा निर्णय घेण्यासाठी किमान तीन महिने लागतील, जरी पक्षाच्या घटनेत किमान चार महिन्यांची तरतूद आहे.
ट्रुडो सत्तेवर कधी आले?
तथापि, लिबरल पक्षाला नवा नेता मिळेपर्यंत ट्रुडो हे अंतरिम पंतप्रधान राहतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. खरंतर, २०१५ मध्ये प्रचंड विजय मिळवून ट्रुडो सत्तेवर आले होते. त्यानंतर २०१९ आणि २०२१ मध्येही त्यांनी त्यांच्या लिबरल्स पक्षाला विजय मिळवून दिला. पण ओपिनियन पोलनुसार, सध्या ते कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी पियरे पॉइलीव्हरे यांच्यापेक्षा २० गुणांनी पिछाडीवर आहेत.
ट्रुडो यांनी का दिला राजीनामा?
ट्रुडो यांच्यावर सदस्यांकडून राजीनामा देण्याचा दबाव होता. त्यांच्याविरोधात खासदार उघडपणे मैदानात उतरले होते. त्यांना हटवण्यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबवली होती. एवढंच नाहीतर पक्षाच्या बैठकीत त्याच्यावर प्रश्नांचा भडीमारही करण्यात आला होता. आता ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली कॅनडामध्ये आपला पराभव निश्चित असल्याचे लिबरल पक्षाला वाटू लागले. त्यामुळेच ट्रुडो यांंनी राजीनामा दिला आहे.