येरमाळा : प्रतिनिधी
वाशी तालुक्यातील बावी शिवारात शेतातील पिकांना विहिरीतील पाणी देण्याच्या वादातून दोन कत्ती, चाकू, काठ्यांचा वापर करीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये तीन ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ५ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी मयतासह १५ जणांविरुद्ध येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत आप्पा काळे व भाग्यवंत काळे हे दोघे बावी शिवारात शेती करत होते. या दोघांच्या शेतीला एकाच विहिरीतून पाणी होते. परंतु या विहिरीतील पाणी शेतीसाठी कमी पडत असल्याने आप्पा काळे यांनी भाग्यवंत काळे यांना पाणी देण्यास नकार दिला. या दोन चुलत भावांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. यामध्ये आप्पा भाऊ काळे, परमेश्वर आप्पा काळे, सुनील परमेश्वर काळे यांचा मृत्यू झाला, तर वत्सला आप्पा काळे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव येथे उपचार सुरू आहेत.
बावी शिवारात २ गटांत झालेली मारहाण एवढी जबर होती की, यामध्ये कत्ती, चाकू काठ्या, बेल्ट आदींचा वापर करण्यात आला. या हाणामारीची माहिती मिळताच येरमाळा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर तात्काळ घटनास्थळ दाखल झाले. जखमींना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल केले. मयत आप्पा काळे यांचा मुलगा राहुल काळे यांच्या फिर्यादीवरून १० जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर वंदना भाग्यवंत काळे यांच्या विरोधी फिर्यादीवरून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील घटनेतील ५ आरोपींना येरमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे