20.2 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रपाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढणे कारणीभूत!

पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढणे कारणीभूत!

केस गळतीची प्रशासनाकडून दखल

बुलडाणा : शेगाव तालुक्यातील सहा गावांतील गावक-यांच्या केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हजारो आबाल-वृद्ध गावकरी धास्तावले असून आरोग्य यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे.

केंद्रीय आरोग्य, आयुष, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील या प्रकाराची आरोग्य यंत्रणांनी गंभीर दखल घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाचे शेगाव तालुका प्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गिते यांना निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेत गावांमध्ये उपचार व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याची मागणी केली. तसेच नामदार प्रतापराव जाधव यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून या गंभीर बाबीबाबत अवगत केले. यामुळे नामदार जाधव यांनीही यात लक्ष घातले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर असल्याचे चित्र आहे.

शेगाव तालुक्यातील भानखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी अट्रट हे स्वत: त्वचारोगतज्ज्ञ आहेत. हे नमुने तपासणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली.
अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिस-या-चौथ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाम्पूने असा प्रकार घडत असावा असे काहींचे मत असले तरी आयुष्यात शाम्पू न वापरणा-या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

शेगाव तालुक्यातील गोंडगाव कालवळ व हिंगणा वैजनाथ या गावांमध्ये केस गळतीचे प्रमाण आढळून आले. तालुका आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण केले असून पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत.

सहा गावांत सर्वेक्षण
आरोग्य विभागाची पथके शेगाव तालुक्यातील टक्कल बाधित गावात डेरेदाखल झाली आहे. जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर प्रशांत तांगडे हे शेगाव तालुक्यात तळ ठोकून आहे. शेगाव तालुक्यातील बाधित गावात युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्यात येत आहे. गावक-यांची तपासणी करण्यात येत असून पाण्याचे नमुने घेण्यात येत आहेत. या सर्वेक्षणावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गिते बारकाईने नजर ठेवून आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR