मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड याच्यावर पवनचक्की कंपनी खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येमागे पवनचक्की खंडणी प्रकरणच असल्याचा आरोप आहे. त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमकपणे वाल्मिक कराड याच्यावर आरोप केले आहेत. वाल्मिक कराड याचे आका धनंजय मुंडे असल्याचाही आरोप सुरेश धस करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रवक्ते मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. हत्येच्या दोन दिवस आधी वाल्मिक कराड हा सुरेश धसांच्या संपर्कात असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद अडचणीत आले आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. वाल्मिक कराडसोबत असलेल्या त्यांच्या संबंधामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे असे म्हटले जात आहे. सुरेश धस हे वाल्मिक कराडवर रोज नवे आरोप करत आहेत. वाल्मिक कराडचे हे सर्व कारनामे कोणाच्या जीवावर होत होते, हे धनंजय मुंडेंना माहीत नाही का, असाही सवाल ते करत आहेत. त्यामुळे रोज नव्या आरोपांना सामोरे जाण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांच्यावर आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) सुरेश धस यांच्यावरही आरोप सुरू झाले आहेत.
अमोल मिटकरी म्हणाले की, संतोष देशमुख हत्येआधी दोन दिवस वाल्मिक कराड हा सुरेश धस यांच्या संपर्कात होता. आमदार धस यांच्यावरही खंडणी, हत्या, जमीन बळकावणे असे आरोप आहेत. त्यांच्यावरील आरोपाची मोठी यादी आहे. धस यांच्यावरील आरोपांचे पुरावे योग्य वेळी बाहेर काढू असा इशारा अमोल मिटकरी यांनी बोलताना दिला.
धनंजय मुंडे यांनी गेल्या दोन दिवसांत दोन वेळा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी राजीनामा दिलेला नाही. सुरेश धस यांच्या आरोपांवर योग्य वेळी उत्तर देऊ असेही मंत्री मुंडे यांनी म्हटले आहे.